अत्यंत क्रूर पद्धतीने खून; आरोपीचा रक्तरंजित प्रवास, पुणे ग्रामीण पोलिसांकडून दुहेरी खुनाचा उलगडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 12:03 IST2025-12-20T12:03:45+5:302025-12-20T12:03:56+5:30
सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि सातत्यपूर्ण तपासाच्या माध्यमातून पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने या दुहेरी खुनाचा पर्दाफाश केला.

अत्यंत क्रूर पद्धतीने खून; आरोपीचा रक्तरंजित प्रवास, पुणे ग्रामीण पोलिसांकडून दुहेरी खुनाचा उलगडा
पुणे : वेगवेगळ्या शहरांमध्ये एकाच महिन्यात दोन खून करून लपण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचा रक्तरंजित प्रवास अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी थांबवला. गेल्या महिन्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे खून करून पुणे जिल्ह्यात आलेल्या या आरोपीने सासवडमध्ये दुसरी हत्या केली. त्यानंतर तो पसार झाला. मात्र, सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि सातत्यपूर्ण तपासाच्या माध्यमातून पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने या दुहेरी खुनाचा पर्दाफाश केला. पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली.
९ डिसेंबर रोजी सासवड शहरातील न्यू आनंद वाईन्सच्या मागील बाजूस सुरू असलेल्या बांधकामाच्या इमारतीत जिन्याखाली राजू दत्तात्रय बोराडे (३८, रा. सासवड, ता. पुरंदर) यांचा गळा चिरलेला मृतदेह आढळून आला. खून अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आल्याने या घटनेने सासवड हादरून गेले. मृताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनंतर सासवड पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी आरोपींना पकडण्याच्या सूचना केल्या होत्या. पथकाने घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, मृत व्यक्तीसोबत दोन अनोळखी व्यक्ती घटनास्थळाकडे जात असल्याचे स्पष्ट झाले. याच फुटेजमधून तपासाची दिशा ठरली. संशयितांचा शोध घेण्यासाठी कोंढवा, हडपसरसह विविध भागांत पथके रवाना करण्यात आली. दरम्यान, सासवडमधील आनंद वाईन्स येथे दारू खरेदीसाठी आलेला एक संशयित पोलिसांच्या नजरेत आला. चौकशीत त्याने सूरज प्रकाश बलराम निषाद असे नाव सांगितले. मात्र, त्याची उत्तरे विसंगत होती. सखोल चौकशीत निषाद याने साथीदार नीरज गोस्वामी याच्यासह खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर गोस्वामी यालाही ताब्यात घेण्यात आले. दोन्ही आरोपी दारूच्या नशेत असताना वाद वाढत गेले आणि त्यातूनच त्यांनी हा खून केल्याचे समोर आले आहे.
चौकशीदरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी गोस्वामी याने काही आठवड्यांपूर्वीच जामखेड येथे पैशांच्या वादातून विकास मधुकर अंधारे (२२) याचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्या घटनेनंतर तो पुणे जिल्ह्यात कामाच्या शोधात आला आणि सासवडमध्ये दारूच्या वादातून दुसरा खून केला. त्यानंतर फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी पकडले. पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलिस निरीक्षक कुमार कदम, सहायक निरीक्षक वैभव सोनवणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.