आसावरी जगदाळेला नोकरी देण्याचा प्रस्ताव महापालिकेने राज्य सरकारला केला सादर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 15:57 IST2025-08-26T15:55:48+5:302025-08-26T15:57:11+5:30
आसावरी जगदाळे यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी शिफारस पत्राद्वारे केली होती.

आसावरी जगदाळेला नोकरी देण्याचा प्रस्ताव महापालिकेने राज्य सरकारला केला सादर
पुणे: देशाला हादरवून सोडणाऱ्या काश्मीर येथील पहेलगाममधील हल्ल्यात पुण्यातील मृत्युमुखी पडलेल्या संतोष एकनाथ जगदाळे यांची कन्या आसावरी यांचा पुणे महापालिकेने नोकरीसाठीचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला आहे. त्यानुसार आसावरी यांना पुणे महापालिकेने वर्ग दोन आणि वर्ग तीनमधील चार पदांपैकी एका ठिकाणी नोकरीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिल्यानंतर आसावरी जगदाळे यांना महापालिकेत नोकरी मिळणार आहे.'
पुणे महापालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांनी हा प्रस्ताव नगरविकास कार्यासन अधिकारी यांच्याकडे पाठविला आहे. आसावरी जगदाळे यांनी महापालिकेकडे त्यांच्या शिक्षणाची माहिती सादर केली आहे. त्यानुसार त्यांना प्रशासन अधिकारी (वर्ग-२), उप अधीक्षक (वर्ग-३), संगणक ऑपरेटर (वर्ग-३) आणि लिपिक टंकलेखक (वर्ग-३) या चार पदांपैकी कुठल्याही पदावर त्यांची नियुक्ती करणे शक्य असल्याचा अहवाल प्रशासनाने राज्य सरकारला पाठवला आहे. आसावरी जगदाळे यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी शिफारस पत्राद्वारे केली होती.