Mumbai Pune Expressway: मुंबई पुणे महामार्गावर माणुसकीचं दर्शन; वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना पोलिसांकडून अन्न-पाण्याची मदत
By किरण शिंदे | Updated: February 4, 2026 16:35 IST2026-02-04T16:35:23+5:302026-02-04T16:35:57+5:30
Mumbai Pune Expressway Traffic: या कोंडीत अडकलेल्या हजारो प्रवाशांना खाण्यापिण्यापासून मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

Mumbai Pune Expressway: मुंबई पुणे महामार्गावर माणुसकीचं दर्शन; वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना पोलिसांकडून अन्न-पाण्याची मदत
पुणे - पुणे - मुंबई महामार्गावर काल टँकर पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातामुळे गेल्या पंधरा तासांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या अपघातानंतर सुरक्षेच्या कारणास्तव महामार्गावरील वाहतूक संथ झाली असून अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या कोंडीत अडकलेल्या हजारो प्रवाशांना खाण्यापिण्यापासून मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
अनेक प्रवासी काल रात्रीपासून महामार्गावर अडकून पडले असून लहान मुले, महिला, वृद्ध आणि आजारी प्रवाशांचे हाल होत असल्याचे दृश्य दिसून येत आहे. अन्न, पाणी आणि मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असतानाच, या कठीण परिस्थितीत मुंबई पुणे महामार्गावर कर्तव्यदक्ष पोलिसांकडून माणुसकीचे दर्शन घडल्याचे पाहायला मिळाले.
लोणावळा शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश रामागिरे आणि लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांनी आपल्या पोलिस स्टाफच्या मदतीने वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनचालकांसह वाहनांमध्ये बसलेल्या प्रवाशांना बिस्कीट, पाणी आणि चिक्कीचे वाटप केले. नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेऊन त्यांनी स्वतः पुढाकार घेत ही मदत पोहोचवली.
गेल्या अनेक तासांपासून वाहतूक ठप्प असल्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष व्यक्त केला जात असला तरी, पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने आपले कर्तव्य बजावत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला. विशेषतः लहान मुलांना आणि वृद्ध प्रवाशांना अन्न व पाण्याची मदत मिळाल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली आहे.