स्वारगेट पोलिसांकडे अनेक वेळा तक्रार अर्ज; गांभीर्यच नाही, एसटी प्रशासन हतबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 13:26 IST2025-02-28T13:24:27+5:302025-02-28T13:26:42+5:30

दोन्ही प्रवेशद्वारांवर जास्त सुरक्षा रक्षक नेमण्यात यावी, सीसीटीव्हींची संख्या वाढवावी, लाइटची सुविधा वाढविण्यात यावी - पोलिसांचा पत्रव्यवहार

Multiple complaint applications to Swargate Police No seriousness ST administration is desperate | स्वारगेट पोलिसांकडे अनेक वेळा तक्रार अर्ज; गांभीर्यच नाही, एसटी प्रशासन हतबल

स्वारगेट पोलिसांकडे अनेक वेळा तक्रार अर्ज; गांभीर्यच नाही, एसटी प्रशासन हतबल

पुणे : स्वारगेट बसस्थानकात खुलेआम होणारी एजंटांची घुसखाेरी, तृतीयपंथीयांकडून प्रवाशांना होणारा त्रास सोडविण्यासाठी स्वारगेट एसटी प्रशासनाकडून गेल्या वर्षभरात पोलिसांकडे ४० पेक्षा जास्त वेळा अर्ज केला आहे. शिवाय दर पंधरा ते वीस दिवसांनी स्वारगेट पोलिसांकडे तक्रार अर्ज करण्यात आला आहे; पण स्वारगेट पोलिसांकडून गांभीर्याने दखल घेतली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बसस्थानकात गुन्हेगारांना कोणाची भीती राहिली नसून, मदत न मिळाल्याने एसटी प्रशासन हतबल झाले आहे.

पुण्यातील वाकडेवाडी (शिवाजीनगर), स्वारगेट आणि पुणे स्टेशन अशी तीन महत्त्वाची स्थानके आहेत. यामध्ये स्वारगेट बसस्थानकातून दैनंदिन १ हजार ७००, तर, वाकडेवाडी येथून ८५० बसेस ये-जा करतात. पुणे स्टेशन येथून मुंबईसाठी बस धावतात. या तीनही बसस्थानकांना अवैध प्रवासी वाहतुकीचा विळखा पडला आहे. बसस्थानकाबाहेरच खासगी ट्रॅव्हल्स, कार लावून अवैध प्रवासी वाहतूक केली जाते. तर काही एजंट थेट बसस्थानकात फिरून प्रवाशांना घेऊन जातात. त्यामुळे एसटी स्थानकातील अधिकाऱ्यांनी बाहेर हाकलण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनाच दमदाटी केली जाते. त्यामुळे एसटीचे कर्मचारी एजंटांना घाबरतात. यामुळे बसस्थानकातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो.

तब्बल ४० वेळा तक्रार अर्ज

स्वारगेट बसस्थानक प्रशासनाकडून स्वारगेट पोलिसांकडे एका वर्षात तब्बल ४० वेळा तक्रार अर्ज दिले आहेत. यामध्ये अवैध प्रवासी वाहतूक, सुरक्षा यासंदर्भातील तक्रारी आहेत. काही अर्जांत नावानिशी आहेत; पण पोलिसांकडून काहीही कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक न घाबरता एसटी स्थानक परिसरात फिरतात. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

गुन्ह्यांचे नाही गांभीर्य

शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर बसस्थानक परिसरात मोबाइल चोरी, मौल्यवान ऐवज चोरी अशा गुन्ह्यांबाबत प्रवासी तक्रारी करतात. तसेच, काही वेळा बसमध्ये प्रवाशाला गुंगीचे औषध देऊन लुटण्याच्या घटना स्वारगेट ते मुंबई प्रवासात घडल्या आहेत. बऱ्याच प्रकारांत तक्रार न दिल्यामुळे गुन्हादेखील नोंदवला जात नाही. त्यामुळे अशा गुन्हेगारी लोकांना वाव मिळत आहे. दुसरीकडे बसस्थानकात अशा प्रकारे घडणाऱ्या घटनांमुळे सर्वसामान्य प्रवासी मात्र घाबरले आहेत.

पोलिसांकडून एसटी प्रशासनाला पत्र

स्वारगेट बसस्थानकातील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी स्वारगेट पोलिसांकडून १६ जुलै २०२४ रोजी पत्रव्यवहार केला होता. यामध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी १५ उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली होती. यामध्ये प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची सोय करावी. आगार परिसर स्वच्छ ठेवण्यात यावे. एसटीच्या सुरक्षा रक्षक सोलापूर, मुंबई, सातारा या ठिकाणी वाढविण्यात यावी. दोन्ही प्रवेशद्वारांवर जास्त सुरक्षा रक्षक नेमण्यात यावी. सीसीटीव्हींची संख्या वाढविण्यात यावी. बसस्थानक परिसरात लाइटची सुविधा वाढविण्यात यावी, यासह इतरही सुविधा करण्याची मागणी पोलिसांकडून करण्यात आली आहे.

Web Title: Multiple complaint applications to Swargate Police No seriousness ST administration is desperate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.