पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने साेमवारी (दि. ५) दुपारी बारावीचा निकाल जाहीर केला असून, यात पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्याने ९७.६४ टक्के निकाल मिळवत अव्वल स्थान पटकावले आहे. शेवटच्या स्थानी भाेर तालुक्याचा क्रमांक लागत असून, या तालुक्याचा निकाल ८९.१३ टक्के लागला आहे. पुणे शहराचा क्रमांक दहाव्या आणि बाराव्या स्थानी लागला आहे.
दरम्यान, बारावी परीक्षेसाठी पुणे जिल्ह्यातून एकूण १ लाख २७ हजार ९६४ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली हाेती. त्यापैकी १ लाख २७ हजार ३८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील १ लाख २० हजार ८५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. याची एकूण टक्केवारी ९४.८७ इतकी आहे.
मुलींमध्येही मुळशीच अव्वल
बारावीच्या परीक्षेसाठी मुळशी तालुक्यातून एकूण २ हजार ८४७ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली हाेती. त्यात मुले १४५३, तर मुलींची संख्या १३९४ इतकी हाेती. प्रत्यक्षात २ हजार ८४३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यापैकी २ हजार ७७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये मुली १३७०, तर मुलांची संख्या १४०६ आहे. टक्केवारीत मुलांच्या (९६.८३) तुलनेत मुली (९८.४९) उत्तीर्ण हाेण्याचे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्यात मुली उत्तीर्ण हाेण्याच्या टक्केवारीतही भाेर तालुका शेवटच्या स्थानी (९४.५१ टक्के) आहे.
मुलांपेक्षा मुली भारी
जिल्ह्यात बारावी परीक्षेसाठी एकूण १ लाख २७ हजार ९६४ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली हाेती. त्यात मुले ६६ हजार ७७४, तर मुली ६१ हजार १९० हाेत्या. त्यापैकी प्रत्यक्षात ६६ हजार ४६७ मुलांनी आणि ६० हजार ९२० मुलींनी परीक्षा दिली. त्यातील ६१ हजार ९१६ मुले (९३.१५ टक्के) आणि ५८ हजार ९३८ मुली (९६.७४) उत्तीर्ण झाल्या. यामध्ये मुलांच्या तुलनेत मुलींचा टक्का ३.५९ टक्क्याने अधिक आहे.
तालुकानिहाय टक्केवारी
१) मुळशी - ९७.६४२) इंदापूर - ९७.२१
३) हवेली - ९६.८४४) पिंपरी-चिंचवड - ९६.५५
५) आंबेगाव - ९५.६६६) शिरूर - ९५.६३
७) बारामती - ९५.६०८) वेल्हा - ९५.५४
९) मावळ - ९५.१०१०) पुणे शहर (पश्चिम) - ९४.५१
११) खेड - ९३.९७१२) पुणे शहर (पूर्व) - ९३.३४
१३) जुन्नर - ९३.२०१४) दाैंड - ९२
१५) पुरंदर - ८९.४७१६) भाेर - ८९.१३