बहुप्रतिक्षित भामा आसखेडचे काम अखेर पोलीस बंदोबस्तात सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 09:21 PM2019-05-17T21:21:59+5:302019-05-17T21:31:01+5:30

भामा आसखेड धरणामधून पाणी आणण्याच्या कामाला अखेर तगड्या पोलीस बंदोबस्तामध्ये शुक्रवारी सुरुवात केली...

The much-awaited Bhima Ashkhade pipeline work was finally started with police protection | बहुप्रतिक्षित भामा आसखेडचे काम अखेर पोलीस बंदोबस्तात सुरु

बहुप्रतिक्षित भामा आसखेडचे काम अखेर पोलीस बंदोबस्तात सुरु

Next
ठळक मुद्देमहापालिकेचे अधिकारी उपस्थित : प्रकल्पग्रस्तांकडून झाला नाही विरोधपोलिसी कारवाईचा उगारला बडगास्थानिक शेतकऱ्यांकडून निषेध

पुणे : पुण्याच्या पुर्व भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी पालिकेने भामा आसखेड धरणामधूनपाणी आणण्याच्या कामाला अखेर तगड्या पोलीस बंदोबस्तामध्ये शुक्रवारी सुरुवात केली. यावेळी पिंपरी-चिंचवड पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दलाच्या जवळपास सव्वाशे जवानांना तैनात करण्यात आले होते. खबरदारीचा उपाय म्हणून गुरुवारी रात्रीच दहा प्रमुख आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यामुळे शुक्रवारी हे कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरु झाले. 
महापालिका भामा आसखेड धरणामधून शहरासाठी पाणी आणणार आहे. या योजनेमधून शहराच्या पूर्वभागाला पाणी पुरवठा केला जाणार आहे. पुणे नगर रस्त्यावरील कळस, संगमवाडी, येरवडा, लोहगाव. धानोरी, कल्याणीनगर, वडगाव शेरी, विमाननगर, खराडी आणि चंदननगर या भागाचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जातो. गेली अनेक वर्ष स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधामुळे हे काम रखडले होते. जमिनीच्या बदल्यात जमीन अशी शेतकºयांची मागणी होती. शासनाने हेक्टरी १५ लाख रुपये मोबदला जाहीर केला. त्यानंतर शेतकऱ्यांनी काही प्रमाणात विरोध सुरुच ठेवला होता. पालिकेने नुकतेच मोबदल्यापोटी देण्यात येणाऱ्या रकमेपैकी ५ कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले. या प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून या वर्षी ३१ ऑक्टोबरपर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे पालिकेचे नियोजन आहे. प्रकल्पाचे काम आणि सिंचन पुनर्स्थापना खर्च किंवा प्रकल्पग्रस्तांना मोबदला देण्यासाठी १८५ कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे.


शुक्रवारी बरेच दिवस बंद असलेले काम पालिकेच्यावतीने सुरु करण्यात आले. शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या जॅकवेलमधून पाणी उपसण्याचे आणि पंप बसविण्याचे काम सुरु करण्यात आले. यावेळी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता सुहास कुलकर्णी यांच्यासह आणखी अधिकारी उपस्थित होते. कामाला सुरुवात झाली असली तरी या कामामध्ये खंड पडू न देणे आणि शेतकऱ्यांसोबत संवादामधून मार्ग काढण्याचे आव्हान असणार आहे. 
====
पोलिसी कारवाईचा उगारला बडगा
पालिकेला प्रकल्पाचे काम सुरु करावयाचे असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गुरुवारी रात्रीच दहा प्रमुख आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले होते. कलम १५१ (३) नुसार त्यांच्यावर कारवाई करीत शुक्रवारी न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांच्याकडून प्रकल्पाच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा आणणार नाही असे हमीपत्र घेतले. त्या हमीपत्रावर त्यांची सुटका करण्यात आली. यासोबतच पोलिसांनी दिवसभरामध्ये ४८ जणांना कलम १५९ नुसार प्रतिबंधात्मक नोटीस बजावली. पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांनी धरणापासून तीन किलोमीटरपर्यंत कलम १४४ लागू करीत १४ दिवसांसाठी जमावबंदी घोषित केली आहे. 
====
स्थानिक शेतकऱ्यांकडून निषेध
प्रकल्पाचे काम पोलीस बंदोबस्तात सुरु करण्यात आले असून काहीजणांना ताब्यात घेण्यात आले. तसेच शेतकऱ्यांना प्रतिबंधात्मक नोटीसा बजावण्यात आल्या. यामुळे पोलिसांचा वापर करुन दडपशाही सुरु असल्याचा आरोप करीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी तीब्र नाराजी व्यक्त करीत पोलीस व प्रशासनाचा निषेध केला. 
====
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
प्रकल्पाच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्यासह दोन सहायक आयुक्त, ९ पोलीस निरीक्षक, १६ सहायक निरीक्षक/उपनिरीक्षक यांच्यासह १८५ पोलीस कर्मचारी व राज्य राखीव दलाचे १०० जवान तैनात करण्यात आले होते. 
====
मागच्या वेळी झालेल्या आंदोलनादरम्यान, एका प्रकल्पग्रस्त शेतकºयाने जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे यावेळी खबरदारीचा उपाय आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस बंदोबस्तात काम सुरु करण्यात आले. काही जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून काही जणांना ताब्यात घेण्यात आले होते. आम्ही हालचालींवर लक्ष ठेवून आहोत. 
- स्मार्तना पाटील, पोलीस उपायुक्त

Web Title: The much-awaited Bhima Ashkhade pipeline work was finally started with police protection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.