Suicide: बारामतीत महावितरण अभियंत्याची गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 14:43 IST2022-02-06T14:42:52+5:302022-02-06T14:43:36+5:30
अभियंत्याने आत्महत्या का केली, याबाबत कारण स्पष्ट होऊ शकले नाही

Suicide: बारामतीत महावितरण अभियंत्याची गळफास घेऊन आत्महत्या
बारामती : बारामती शहरातील महावितरण सहाय्यक अभियंत्याने स्वत:च्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मनीष माधवराव दंडवते ( वय ४३ )असे या अभियंत्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दंडवते हे दोन दिवसापासून कामावर हजर नव्हते. येथील वर्ग दोन बिल्डिंग फ्लॅट नंबर अ ६ तिसरा मजला उर्जा भवन कर्मचारी वसाहत येथे ते राहण्यास होते. शनिवारी (दि ५) सकाळी डबेवाला त्यांना जेवणाचा डबा देण्यासाठी आला. मात्र, दंडवते यांनी दरवाजा उघडला नाही. प्रतिसाद न मिळाल्याने डबेवाल्याने तावदान आतून डोकावून आत पाहिले. यावेळी त्याला दंडवते यांनी किचनमध्ये नायलॉन दोरीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर डबेवाल्याने पोलीस ठाण्यामध्ये खबर दिली.
पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील यांनी जाऊन पाहणी केली. दंडवते यांचा दरवाजा आतून बंद होता. त्यानंतर दरवाजा तोडून दंडवते यांचा दोन पंचांसमक्ष पंचनामा करून मृतदेह खाली घेण्यात आला. शवविच्छेदनासाठी सिल्वर जुबली याठिकाणी दंडवते यांंचा मृतदेह पाठवण्यात आला आहे. अभियंता दंडवते हे या ठिकाणी कुटुंबा शिवाय राहत होते. त्यांचे कुटुंबीय सोलापूर या ठिकाणी राहण्यास होते. घटनेबाबत त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आलेली आहे. दंडवते यांनी आत्महत्या का केली, याबाबत कारण स्पष्ट होऊ शकले नाही.