MPSC exam : राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या तात्पुरत्या निवड याद्या प्रसिद्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 15:30 IST2026-01-06T15:29:44+5:302026-01-06T15:30:52+5:30
- उमेदवारांकडून भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प मागविण्यात येत आहे. ही यादी निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची आहे.

MPSC exam : राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या तात्पुरत्या निवड याद्या प्रसिद्ध
पुणे : राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-२०२४ च्या पदनिहाय तात्पुरत्या निवड याद्या राज्य लाेकसेवा आयोगाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या आहेत. त्याआधारे उमेदवारांकडून भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प मागविण्यात येत आहे. ही यादी निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची आहे.
पसंतीक्रम सादर न केलेल्या उमेदवारांचे पसंतीक्रम जाहिरातीतील परिच्छेद १०.२.१०.२. (४) नुसार ग्राह्य धरण्यात आले आहेत. वैद्यकीय तपासणी प्रक्रिया पूर्ण न केलेल्या / अनुपस्थित उमेदवारांना तात्पुरत्या निवड यादीतून वगळण्यात आले आहे, असे राज्य आयाेगाने स्पष्ट केले आहे.
न्यायलयीन प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर प्रस्तुत परीक्षेच्या बैठक क्रमांक PN004070, NS001270, PN011140 व PN014009 या उमेदवारांचे निकाल राखून ठेवले आहेत. प्रस्तुत परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्याकरिता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ONLINE FACILITES या मेनूमध्ये Post Preference / Opting Out' वेबलिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे.
सदर वेब लिंक दि. ७ ते १३ जानेवारी यादरम्यान सुरू राहील. भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प निवडणाऱ्या उमेदवारांचा शिफारशीकरिता विचार करता येणार नाही, असे आयाेगाच्या उपसचिवांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.