चिमुकलीचा गळा दाबून खून करणाऱ्या आईला जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 15:28 IST2025-01-17T15:27:42+5:302025-01-17T15:28:24+5:30
माझ्या मुलीला न्याय मिळाला, अशी समाधानकारक प्रतिक्रिया मुलीच्या वडिलांनी दिली

चिमुकलीचा गळा दाबून खून करणाऱ्या आईला जन्मठेप
पुणे: महिलेने हे कृत्य कोणत्याही गुन्हेगारी मानसिकतेमधून नव्हे तर लग्नाच्या नैराश्यातून केले. या घटनेनंतर लग्नानंतरचा दोघांचा वाद कौटुंबिक न्यायालयापर्यंत पोहोचला होता. ती तिच्या आईबरोबर वेगळी राहात होती. या आधारावर हे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण म्हणता येणार नाही, असा निष्कर्ष नोंदवत सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी चिमुकलीचा गळा दाबून खून करणाऱ्या महिलेला जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
अनिता संजय साळवे असे शिक्षा झालेल्या महिलेचे नाव आहे. ४ फेब्रुवारी २०१६ रोजी आरोपी अनिता हिने स्वत:च्याच मुलीचा गळा दाबून खून केला होता. आरोपीचे पती सकाळी कामावर गेले असताना घरातच हा प्रकार घडला. या घटनेने संपूर्ण पुणे जिल्हा हादरला होता. याप्रकरणी आरोपीचे पती संजय साळवे यांनी वारजे पोलिस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली होती. वारजे माळवाडी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक करून तपास करत तिच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर तिची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती. २०२१ पासून या खुनाची सुनावणी महाजन यांच्या कोर्टात सुरू होती. यात फिर्यादी पक्षाने आरोपीविरुद्ध सबळ पुरावा सिद्ध केला. या पुराव्याच्या आधारे न्यायालयाने महिलेला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. फिर्यादी यांनी माझ्या मुलीला न्याय मिळाला, अशी समाधानकारक प्रतिक्रिया दिली.
या खटल्यात सरकारी पक्षातर्फे ॲड. मिलिंद दतरंगे तसेच मूळ फिर्यादीतर्फे अनिल औसेकर, ॲड. प्रतीक शिंदे आणि ॲड. वृषाली भोसले यांनी काम पाहिले. आरोपीतर्फे ॲड. सचिन झालटे पाटील यांनी बाजू मांडली.