सांगवी : गेली दोन ते तीन वर्षांच्या कालावधीत विषारी हातभट्टी दारू पिऊन ३० पेक्षा अधिक तरुणांचा मृत्यू झाल्याने अनेक महिला विधवा होऊन संसाराच्या राख रांगोळ्या झाल्या. अवैध धंदे वाल्यांच्या विरोधात आवाज उठवल्या प्रकरणी जीवे मारण्याची व खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याने संतप्त झालेल्या दांपत्याने बारामती येथे चक्री उपोषण सुरू केले आहे. बारामती येथील साठे नगर (कसबा), येथील अवैध हातभट्टी, मटका व जुगार अड्डे कायमस्वरूपी बंद करण्या संदर्भात १३ जानेवारी पासून प्रशासकीय भवन समोर चक्री उपोषण सुरू आहे. तर रणदिवे यांनी पोलिसांविरोधात हप्ते घेऊन अवैध धंदे सुरू असल्याचा गंभीर आरोप करत लावलेल्या फ्लेक्सने बारामती करांचे लक्ष वेधले आहे.
संजय सोपान रणदिवे (रा. साठे नगर, कसबा, बारामती) व त्यांच्या पत्नी यांनी अनेक नातेवाईक, तरुण पोटाचे आजार होऊन मृत्यमुखी पडू लागले असल्याने या उपोषणास बसल्या आहेत. १३ दिवस उलटून देखील प्रशासन मात्र, दखल घेत नसल्याचे समोर आले आहे. हातभट्टी दारू प्यायल्याने अनेक तरुणांचे दुर्दैवी मृत्यू होऊ लागले आहेत. कसबा परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून हातभट्टी दारू, मटका आणि 'ऑनलाइन चक्री' सारखे जुगार अड्डे सुरू आहेत. यामुळे तरुण पिढी बरबाद झाली असून व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांचे संसार उद्धवस्त झाले आहेत.
तक्रार करताच पोलिसांकडून अवैध धंदे वाल्यांना खबर
या अवैध धंद्यांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी रणदिवे यांनी ११२' वर तक्रार केली. परंतु, पोलीस घटनास्थळी आले असता त्यांनी माहिती गुपित न ठेवता दारू विक्री करणाऱ्या महिलांना आपल्या विरोधात तक्रार आली असल्याची माहिती सांगितली. यामुळे संबंधित अवैध धंदे चालवणा-या महिलांनी रणदिवे कुटुंबाला जीवे मारण्याची आणि 'विनयभंग' व बलात्काराचे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप उपोषणकर्ते रणदिवे यांनी नमूद अर्जात केला आहे.
विविध मागण्या
अण्णाभाऊ साठे चौक ते ढवाण चौक या मुख्य रस्त्यावर सीसीटीव्हीची देखरेख करावी. कसबा मधील सर्व संवेदनशील भागात उच्च क्षमतेचे सीसीटीव्ही बसवण्यात यावेत. या कॅमे-यांचा सर्व्हर डेटा स्थानिक पोलीस स्टेशनऐवजी थेट उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय किंवा प्रांताधिकारी कार्यालयाच्या नियंत्रणात असावा, बारामतीमधील साठेनगर येथील अवैध हातभट्टी दारू विक्रीचा प्रश्न गंभीर आहे म्हणून त्या ठिकाणी मुंबई पोलीस अधिनियम कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात यावे. अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
बारामती शहरात पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरूच नाहीत. अवैध धंदे आम्हाला दाखवा आम्ही लगेच कारवाई करतो - श्रीशैल चिवडशेट्टी (पोलीस निरीक्षक बारामती शहर)
सध्या अवैध दारू धंदे बंद आहेत,आम्ही पेट्रोलिंग करत असतो,या अगोदर देखील केसेस केल्या आहेत. पुन्हा अवैध दारूचे अड्डे सापडल्यास आम्ही केसेस करत आहोत.- शहाजी शिंदे (निरीक्षक, उत्पादन शुल्क विभाग, बारामती)
Web Summary : Over 30 deaths from illicit liquor in Baramati sparked protests. A couple is fasting, alleging police inaction and threats from illegal liquor vendors, demanding CCTV surveillance and action against the problem.
Web Summary : बारामती में अवैध शराब से 30 से अधिक मौतें होने पर विरोध प्रदर्शन शुरू हो गया। एक दंपति पुलिस की निष्क्रियता और अवैध शराब विक्रेताओं से धमकियों का आरोप लगाते हुए उपवास कर रहा है, सीसीटीवी निगरानी और समस्या के खिलाफ कार्रवाई की मांग कर रहा है।