तब्बल २१ दिवसांनंतर मॉन्सूनची आगेकूच, ९५ टक्के महाराष्ट्र व्यापला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 13:29 IST2025-06-17T13:29:02+5:302025-06-17T13:29:24+5:30

-उर्वरित भागात दोन दिवसांत पोचणार, कोकणात मुसळधार, मध्य महाराष्ट्रात जोरदार

Monsoon advances after 21 days, covers 95 percent of Maharashtra | तब्बल २१ दिवसांनंतर मॉन्सूनची आगेकूच, ९५ टक्के महाराष्ट्र व्यापला 

तब्बल २१ दिवसांनंतर मॉन्सूनची आगेकूच, ९५ टक्के महाराष्ट्र व्यापला 

पुणे : अरबी समुद्रातील गुजरात किनारपट्टीवर तसेच बंगालच्या उपसागरातही निर्माण झालेल्या चक्रीय स्थितीमुळे मॉन्सूनचे वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे तब्बल २१ दिवसांनंतर मॉन्सूनने आगेकूच केली आहे. सध्या मॉन्सूनने राज्याचा अमरावती व नागपूर जिल्ह्याचा काही भाग वगळता ९५ टक्क्यांहून अधिक भूभाग व्यापला आहे. पुढील दोन दिवसांत मॉन्सून संपूर्ण राज्यात पसरणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील तीन ते पाच दिवस राज्यात मॉन्सून सक्रिय राहणार आहे. कोकणात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

राज्यात मॉन्सूनने २५ मे रोजी धडक दिली. त्यानंतरच्या २४ तासांतच मुंबई, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये जोरदार हजेरी लावली. मात्र, त्यानंतर प्रगतीसाठी आवश्यक असणारी स्थिती निवळल्याने मॉन्सून गेले २१ दिवस याच भागात रेंगाळला होता. अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरातही मॉन्सूनच्या वाऱ्यांसाठी अनुकूल स्थिती असल्याने पावसाने उघडीप दिल्याचे चित्र राज्यात निर्माण झाले होते.

भारतीय समाजशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप म्हणाले,‘गुजरात किनारपट्टीवरील अरबी समुद्रात तसेच बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मॉन्सूनच्या वाऱ्यांची तीव्रता वाढली असून पश्चिमेकडील वारे राज्यात आर्द्रता मोठ्या प्रमाणावर घेऊन येत आहेत. परिणामी मॉन्सून सक्रिय झाला आहे. यामुळे मॉन्सून सध्या संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्र, गुजरातचा काही भाग, नैऋत्य मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, ओडिशा आणि उपहिमालयीन पश्चिम बंगाल तसेच सिक्कीमच्या काही भागात पुढे सरकला आहे. पुढील दोन दिवसांत मॉन्सून राज्याचा संपूर्ण भूभाग व्यापेल.’

 

Web Title: Monsoon advances after 21 days, covers 95 percent of Maharashtra