राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाऊंट; पैशाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 16:13 IST2021-07-24T16:05:39+5:302021-07-24T16:13:29+5:30
फेक अकाउंटवरून मेसेजद्वारे काहींकडे ५० हजार रुपयांची मागणी; तक्रार दाखल

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाऊंट; पैशाची मागणी
शेलपिंपळगाव : मागील काही दिवसांपासून फेसबुक हॅक होण्याच्या तसेच अन्य व्यक्तीच्या नावे बनावट अकाऊंट उघडून मदतीच्या नावाखाली पैसे मागण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. विशेष म्हणजे खेडचेआमदार दिलीप मोहिते - पाटील यांच्या नावाने अज्ञात कोणीतरी फेसबुकवर फेक अकाऊंट तयार करून त्याद्वारे पैशाची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर घडलेला प्रकार आमदार दिलीप मोहिते - पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी अधिकृत फेसबुक अकाउंटवरून सर्वांना ही बाब लक्षात आणून दिली आहे.
फेसबुक पेजवर Dilip Mohite Patil अशा इंग्रजीत नावाने कोणी तरी अज्ञात व्यक्तीने अकाऊंट उघडले असून सोबत या फेक अकाऊंटवर आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा फोटो वापरला आहे. अकाउंटवरून अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात आल्या आहेत. आमदार मोहिते पाटील यांचे नाव व फोटो पाहिल्याने अनेकांनी ही रिक्वेस्ट स्वीकारली आहे. मात्र शुक्रवारी (दि.२३) रात्री या फेक अकाउंटवरून मेसेजद्वारे काहींकडे ५० हजार रुपयांची गरज असल्याचे भासवून पैशांची मागणी करण्यात आली आहे.
ही बाब आमदार मोहिते पाटील यांच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ ही बाब आमदारांच्या निदर्शनात आणून दिली. त्यानंतर आमदार मोहिते यांनी कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. अशा खोट्या पणाला कोणीही बळी पडू नका आणि समाजात अश्या प्रकारे कारस्थान करणाऱ्या व्यक्तीनं पासून सावध राहण्याचे आवाहन आमदार दिलीप मोहिते - पाटील यांनी केले आहे.