मोहिते यांचा बाजार समितीचा अर्ज रद्द

By Admin | Updated: August 23, 2015 04:14 IST2015-08-23T04:14:55+5:302015-08-23T04:14:55+5:30

खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी खेड तालुका बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दाखल केलेला उमेदवारी अर्ज जिल्हा उपनिबंधकांनीही फेटाळला आहे.

Mohite's marketing committee's application has been canceled | मोहिते यांचा बाजार समितीचा अर्ज रद्द

मोहिते यांचा बाजार समितीचा अर्ज रद्द

पुणे/राजगुरुनगर : खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी खेड तालुका बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दाखल केलेला उमेदवारी अर्ज जिल्हा उपनिबंधकांनीही फेटाळला आहे. त्यामुळे त्यांचा निवडणूक लढविण्याचा मार्ग आता बंद झाला आहे.
बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. या निवडणुकीत कृषी पतसंस्था मतदार संघातून मोहिते यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, अनिल रामचंद्र राक्षे आणि चांगदेव रामचंद्र शिवेकर यांनी त्यांच्या अर्जावर हरकत घेतल्याने छाननीत निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी हा अर्ज फेटाळला होता. त्यामुळे मोहिते यांनी जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांच्याकडे अपिल केले होते. शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या सुनावणीनंतर उपनिबंधकांनीही अर्ज फेटाळला आहे. तसा निकालही त्यांनी दिला आहे. उपनिबंधक कार्यालयातून या माहितीस दुजोरा देण्यात आला.
कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियम १९६३ च्या कलम ४१ नुसार संचालक हे पदावर असताना वैयक्तिक अथवा एखाद्या कंपनीचे भागीदार म्हणून बाजार समितीशी एखाद्या सेवेसाठी आर्थिक व्यवहार करु शकत नाहीत. मात्र, मोहिते हे संचालक असलेल्या डीडीएम सनक्राफ्ट सोलर सिस्टीम प्रा. लि. या कंपनीने एका सौरउर्जा प्रकल्पासाठी बाजार समितीशी व्यवहार केलेला आहे. त्यामुळे ते बाजार समितीचे लाभार्थी ठरत असल्याने त्यांच्या अर्जाला हरकत घेण्यात आली होती. ही हरकत व नियम विचारात घेऊन अर्ज रद्द ठरविण्यात आला आहे.
सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे उपनिबंधकांनी हा निर्णय दिला आहे. मी सोमवारी उच्च न्यायालयात अपील करणार असून तेथे मला नक्कीच न्याय मिळेल असे मोहीते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Mohite's marketing committee's application has been canceled