पूर्ववैमनस्यातून टोळक्याने केला प्राणघातक हल्ला, येरवड्यातली धक्कादायक घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 17:56 IST2021-03-04T17:46:54+5:302021-03-04T17:56:55+5:30
रात्री उशिरापर्यंत पाच संशयित आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात...

पूर्ववैमनस्यातून टोळक्याने केला प्राणघातक हल्ला, येरवड्यातली धक्कादायक घटना
येरवडा - पूर्ववैमनस्यातून टोळक्याने केलेल्या सशस्त्र हल्ल्यात शुभम जगन्नाथ शेंडगे ( वय २१, रा. इराणी मार्केट मागे गाडीतळ) हा युवक जखमी झाला आहे. येरवडापोलिसांनी टोळक्यामधील दहा ते बारा आरोपींविरुद्ध बेकायदेशीर जमाव जमवून सशस्त्र दहशत माजवत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गंभीर गुन्ह्यातील पाच संशयित आरोपींना येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शुभम हा बुधवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्याचा मित्र आदेश जगताप याच्यासोबत शेलारचाळ याठिकाणी सुट्टे पैसे आणण्यासाठी गेला होता. मागील काही दिवसांपासून आरोपी जुन्या भांडणाच्या रागातून आदेशचा पाठलाग करत होते. मात्र, याचवेळी शेलारचाळ या ठिकाणी आरोपींनी लोखंडी रॉड, तलवार व कोयत्याने शुभमवर वार करत त्याला गंभीर जखमी केले. या हल्ल्यानंतर आरोपींनी दहशत माजवत तिथून पळ काढला. या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शुभमला त्याच्या नातेवाईकांनी उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत पाच संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या गुन्ह्यात काही अल्पवयीन आरोपी यांचा देखील समावेश आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर करपे करत आहेत.