हाय सिक्युरिटी नंबर प्लेटवरून मनसेचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 13:54 IST2025-02-20T13:54:38+5:302025-02-20T13:54:57+5:30
सर्वोच्च न्यायालयाने वाहन चोरीला आळा घालण्यासाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट सक्तीची करण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले

हाय सिक्युरिटी नंबर प्लेटवरून मनसेचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा
पुणे - राज्यात हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसंदर्भात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. २०१९ पूर्वीच्या वाहनांसाठी ही नंबर प्लेट सक्तीची करण्यात आली आहे, मात्र या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली आहे. मनसेचे प्रदेश सरचिटणीस अजय शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवत हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे.
सरकारचा निर्णय सर्वसामान्यांवर अन्यायकारी
सर्वोच्च न्यायालयाने वाहन चोरीला आळा घालण्यासाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट सक्तीची करण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले होते. त्यानुसार महाराष्ट्रासह अनेक राज्यांत त्याची अंमलबजावणी सुरू झाली. मात्र, कोट्यवधी वाहनधारकांना हा नियम सक्तीचा करून सरकार त्यांच्यावर अन्याय करत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.
अजय शिंदे म्हणाले, "हा निर्णय सामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करायला लावणारा आहे. यातून सरकारला दंडाच्या रूपात जबरदस्तीने पैसे वसूल करता येतील. या नव्या नियमामुळे भ्रष्टाचाराचे नवे कुरण निर्माण होईल. महाराष्ट्र सरकारने काही निवडक कंपन्यांना या नंबर प्लेट पुरवण्याचे कंत्राट दिले आहे, त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेत गैरव्यवहाराची शक्यता आहे."
सरकारने फेरविचार करावा - मनसेची मागणी
मनसेने हा नियम रद्द करण्याची मागणी करत मुख्यमंत्री फडणवीस यांना थेट पत्र पाठवले आहे. "सरकारने न्यायालयाचा आदेश ढाल बनवून हा निर्णय लादू नये. २०१९ पूर्वीच्या वाहनांसाठी हा नियम ऐच्छिक ठेवावा," अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. राज्यात अनेक वाहनधारक या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करत आहे.