आईसह अल्पवयीन मुलीची देहविक्री; स्पा सेंटरमधील धक्कादायक प्रकार, आता कारवाईत थेट ‘सील’ करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 10:12 IST2025-07-11T10:11:46+5:302025-07-11T10:12:20+5:30

अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने स्पा सेंटरमध्ये मसाज आणि अन्य सेवांच्या नावाखाली देहविक्री होत असल्याचे यावरून दिसून येत आहे

Minor girl and her mother sold for sex; Shocking incident at spa center, now action will be taken to 'seal' it | आईसह अल्पवयीन मुलीची देहविक्री; स्पा सेंटरमधील धक्कादायक प्रकार, आता कारवाईत थेट ‘सील’ करणार

आईसह अल्पवयीन मुलीची देहविक्री; स्पा सेंटरमधील धक्कादायक प्रकार, आता कारवाईत थेट ‘सील’ करणार

पुणे : शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली खुलेआम देहविक्री होत असल्याचे अनेक प्रकार यापूर्वी समोर आले होते. गेल्या १० दिवसांमध्ये पोलिसांनी चार ठिकाणी कारवाई करत २४ पीडितांची सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी ११ आरोपींना अटक केली असून, १ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी विमानतळ, सिंहगड आणि बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाई केलेल्या स्पासह भविष्यात कारवाई होणारे स्पा ‘सील’ करणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. यापूर्वी माजी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी अशा प्रकारे कारवाई करत दोन इमारती सील केल्या होत्या.

शहरातील अनेक भागांमध्ये स्पाच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय केला जातो. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने सोमवारी (दि. ७) पोरवाल रोड, धानोरी परिसरातील लक्स स्पा सेंटरवर कारवाई केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या विमानतळ, बाणेर आणि सिंहगड पोलिसांच्या पथकांनी तीन वेगवेगळ्या कारवाया केल्या. दरम्यान, स्पामधील दोन अल्पवयीन मुलींना आर्थिक प्रलोभन दाखवून वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतरदेखील एखाद्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत असे प्रकार निदर्शनास आले, तर संबंधित ठाणेदाराला जबाबदार धरले जाणार असल्याचे म्हटले आहे. पोलिस आयुक्तांनी चौकी प्रभारी अधिकाऱ्यांनासुद्धा मागील काही बैठकांमध्ये याबाबत सूचना दिल्या होत्या, त्यानंतरदेखील स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे गुन्हे शाखेच्या कारवाईमुळे स्पष्ट झाले.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कडक भूमिकेमुळे एकेकाळी शहरात फोफावलेल्या स्पा सेंटरमधील गैरप्रकारांना मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे. परंतु, अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने स्पा सेंटरमध्ये मसाज आणि अन्य सेवांच्या नावाखाली देहविक्री होत असल्याचे यावरून दिसून येते. या व्यवसायात ठराविक देशातील विदेशी तरुणी आढळून येतात. पर्यटन किंवा अन्य कारणांनी भारतात आल्यानंतर त्यांच्याकडून अतिरिक्त सेवांच्या नावाखाली वेश्या व्यवसायासाठी स्पा मालक आणि मॅनेजरकडून प्रवृत्त केले जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईनंतर समोर आले.

आईसह अल्पवयीन मुलीला देहविक्री करण्यासाठी ढकलले

पोरवाल रोड येथील स्पावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने केलेल्या कारवाईत दोन अल्पवयीन मुलींसह पाच तरुणींची सुटका करण्यात आली. दरम्यान, स्पा मालक, मॅनेजर आरोपी महिलेने आर्थिक प्रलोभन दाखवून आईसह तिच्या अल्पवयीन मुलीला देहविक्री व्यवसायात ढकलल्याचे निदर्शनात आले आहे. याप्रकरणी किरण बाबूराव आडे उर्फ अनुराधा बाबूराव आडे (२८, रा. राधे निवास, लेन क्र. ६. खराडी) या महिलेविरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.

 

Web Title: Minor girl and her mother sold for sex; Shocking incident at spa center, now action will be taken to 'seal' it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.