पुण्यातील २०१९ च्या पुराला 'मेट्रो' जबाबदार ; जलसंपदाचा ठपका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 12:24 IST2020-04-13T12:23:56+5:302020-04-13T12:24:39+5:30
वारंवार सांगितल्यानंतरही पावसाळ्यापूर्वी हा भराव न काढल्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.

पुण्यातील २०१९ च्या पुराला 'मेट्रो' जबाबदार ; जलसंपदाचा ठपका
पुणे : मेट्रोच्या बांधकामासाठी डेक्कन येथे नदीपात्रात तसेच मुळा मुठा संगमाजवळ मोठा भराव न काढण्यामुळे २०१९ मधील पावसाळ्यामध्ये खडकवासला धरणातून कमी विसर्ग सोडला असताना नदीच्या नैसर्गिक प्रवाहास अडथळा निर्माण झाल्यामुळे नदीच्या पुर पातळीपर्यंत पाणी येऊन पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. मेट्रोला अनेकदा सांगूनही त्यांनी हा भराव न काढण्यापूर्वीपुणे शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. या पुराला मेट्रो जबाबदार असल्याचा ठपका जलसंपदा विभागाने मेट्रोवर ठेवला आहे.
जलसंपदा विभागाने मेट्रोला पाठविलेल्या पत्रात पूराला जबाबदार ठरविले आहे. २०१९ मध्ये मुठा व मुळा नदीला किमान दोनदा पूर आला होता. डेक्कन परिसरातील अनेक भाग जलमय झाले होते. याबाबत हरित लवादाकडे याचिकाही करण्यात आल्या होत्या. जलसंपदा विभागाने २०१९ च्या पावसाळ्यापूर्वी मुठा नदीपात्रातील भराव काढण्याबाबत पत्राद्वारे कळविले होते. वारंवार सांगितल्यानंतरही पावसाळ्यापूर्वी हा भराव न काढल्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे आता जलसंपदाने पुन्हा एकदा मेट्रोला पत्र पाठविले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, आगामी पावसाळा सुरु होण्यास अद्याप दोन महिन्यांचा कालावधी आहे. तोपर्यंत आपल्या स्तरावरुन मेट्रो रेल बांधकाम करताना नदीपात्रात करण्यात आलेले भराव/ प्लॅटफॉर्म तातडीने काढून टाकण्यात यावेत. जेणेकरुन नदीच्या पूरवहन क्षेत्रातील अडथळा दूर होऊन पुरसदृश परिस्थिती निर्माण होणार नाही. मेट्रो रेल बांधकाम करताना नदीपात्रात करण्यात आलेले भराव/ प्लॅटफॉर्म वेळीच काढले नाहीत तर, त्यामुळे उद्भवणार्या पूर परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनवर राहणार असल्याचा इशारा जलसंपदाने दिला आहे. पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता सं. द. चोपडे यांनी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कार्यकारी संचालकांना हे पत्र पाठविले आहे.