मेट्रोचे खांब सोडेनात, सहा चोरट्यांना अटक; सुरक्षारक्षकाच्या तत्परतेमुळे चोरीचा प्रकार उघड
By नितीश गोवंडे | Updated: January 12, 2025 18:53 IST2025-01-12T18:52:00+5:302025-01-12T18:53:47+5:30
शिवाजीनगर न्यायालय परिसरातील कामगार पुतळा परिसरात मेट्रोचे साहित्य ठेवण्यात आले आहे..

मेट्रोचे खांब सोडेनात, सहा चोरट्यांना अटक; सुरक्षारक्षकाच्या तत्परतेमुळे चोरीचा प्रकार उघड
पुणे : शिवाजीनगर भागातील कामगार पुतळा परिसरातून मेट्रोचे दोन लाख रुपयांचे लोखंडी खांब चोरल्याचा प्रकार उघड झाला. या प्रकरणी पोलिसांनी चोरट्यांना अटक केली. गणेश मच्छिंद्र कांबळे (४८), अनिकेत महेंद्र कांबळे (२७), तौसिफराज फैजअहमद शेख, शमशुद्दीन युसुफअली शेख मन्सुरी (सर्व रा. कामगार पुतळा, शिवाजीनगर), वसीम अयुब पठाण (३२, रा. इंदिरानगर, गुलटेकडी) आणि मुस्तफा मुस्तकीम शेख (३५, रा. कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत मेट्रोचे सुरक्षारक्षक चंद्रकांत शेलार (५१, रा. थेरगाव, चिंचवड) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अधिक माहितीनुसार, शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहे. शिवाजीनगर न्यायालय परिसरातील कामगार पुतळा परिसरात मेट्रोचे साहित्य ठेवण्यात आले आहे, दोन दिवसांपूर्वी कांबळे, शेख, मन्सुरी, पठाण यांनी कामगार पुतळा परिसरात ठेवलेले दोन लाख रुपयांचे लोखंडी खांब चोरले.
एका वाहनात भरून ते भंगारात विक्री करणार होते. मेट्रोचे सुरक्षारक्षक चंद्रकांत शेलार यांनी त्यांना हटकले. आरोपी लाेखंडी खांब चोरून नेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती मेट्रोचे अधिकारी, तसेच पोलिसांना दिली. सहा जणांना पोलिसांनी अटक केली. पोलिस उपनिरीक्षक कविराज पाटील तपास करत आहेत.