सोम्या गोम्या, अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊ नये; मेधा कुलकर्णी संतापल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 12:55 IST2025-04-07T12:55:00+5:302025-04-07T12:55:24+5:30
घैसास यांच्या वडिलांच्या हॉस्पिटलचा या घटनेची काही संबंध नसताना केलेले हे मोडतोडीचे उर्मट कृत्य अनेकांच्या जिव्हारी लागले आहे

सोम्या गोम्या, अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊ नये; मेधा कुलकर्णी संतापल्या
पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी भाजप महिला आघाडीने डॉक्टर घैसास यांच्या रुग्णालयाची तोडफोड केली, या कृत्याचा भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी निषेध करत शहराध्यक्षांना पत्र लिहिलंय. मात्र हे पत्र आपल्याला मिळाले नसल्याचे शहराध्यक्षांनी स्पष्ट केले आहे, या प्रकरणावरून भाजपमध्ये पदाधिकाऱ्यांचाच एकमेकांशी मेळ नसल्याचे अधोरेखित झाले आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी भाजप महिला आघाडीने डॉक्टर घैसास यांच्या रुग्णालयाची तोडफोड केली, या कृत्याचा भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी निषेध करत शहराध्यक्षांना पत्र लिहिलंय, विशेष म्हणजे या पत्राद्वारे महिला आघाडीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना समज देण्याची गरज असल्याचं मेधा कुलकर्णींनी म्हटलं, मेधा कुलकर्णींनी घेतलेल्या या भूमिकेमुळे भाजपच्या राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली आहे.
पत्रात काय म्हटलंय...
गर्भवतीचा मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. माझ्या संपूर्ण संवेदना दिवंगत मातेविषयी, तिच्या दोन अर्भकांविषयी आणि तिच्या कुटुंबीयांविषयी मी व्यक्त करते. कोणावरही असा प्रसंग येऊ नये. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने आपला सविस्तर खुलासा केलेला आहे, असे सांगत कुलकर्णी यांनी पत्रात म्हटले आहे की, अनामत रक्कम मागण्यात आलेली नव्हती, उलट न कळवताच नातेवाईक रुग्णाला घेऊन निघून गेल्याचे स्पष्टीकरणात म्हटले आहे. प्रसुती जोखमीची असल्याने मूल दत्तक घेण्याचा सल्ला व इतर अनेक वैद्यकीय सल्ले डावलून महिलेच्या आयुष्याशी धोका पत्करून कुटुंबीयांकडून निर्णय घेण्यात आले असे अनेक तपशील खुलाशात दिले आहेत. त्याची शहानिशा करून चूक घडली असल्यास वरिष्ठांनी योग्य ती कायदेशीर कार्यवाही करणे अपेक्षित आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा यात किती दोष आहे यांची माहिती करून न घेता भाजपच्या महिला मोर्चाच्या सदस्यांनी उन्मादात जे वर्तन केले त्याबद्दल सर्वसामान्यांमध्ये प्रचंड रोष आहे. डॉ. सुश्रुत पैसास यांच्या वडिलांच्या क्लिनिकमध्ये जाऊन तोडफोड करणे हे भाजपाच्या पुणे महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा फरांदे व इतर पदाधिकाऱ्यांना निश्चितच शोभले नाही. आंदोलन करण्याच्या इतर सभ्य पद्धती आहेत ज्याचा अवलंब करणे विचारधारेला धरून ठरेल असे मला वाटते, असे कुलकर्णी यांनी म्हटले आहे. कुठल्यातरी सोम्या गोम्या, अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन करण्याचे काम नाही. शिवाय घैसास यांच्या वडिलांच्या हॉस्पिटलचा या घटनेची काही संबंध नसताना केलेले हे मोडतोडीचे व उर्मट कृत्य अनेकांच्या जिव्हारी लागले आहे व या संदर्भात सातत्याने परिसरातील नागरिकांचे नाराजीचे फोनही मला येत आहेत. दिल्लीतून अधिवेशनातून परत आज आल्यावर मी याविषयी अनेकांकडून माहिती घेतली,
सवंग प्रसिद्धीच्या मागे लागून पुढे जाण्याचे किंवा इतरही अनेक सोपे मार्ग निवडण्याचे मोह कार्यकर्त्यांनी टाळले पाहिजेत. हे समजावून सांगण्याचे कार्य पुणे शहराचे अध्यक्ष या नात्याने आपण कराल व महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांना समज देऊन त्यांना आपल्या पदाचा समजदारपणे व विनम्रतेने वापर करण्यास सांगाल अशी आशा करते.
चित्रा वाघ यांनी केलं होतं कौतुक
ज्या डॉक्टरांमुळे दोन चिमुकल्या आईच्या मायेला पोरक्या झाल्या. त्या डॉ. घैसासला भाजप महिला मोर्चाच्या रणरागिणींनी चांगलाच धडा शिकवला. बेरड आणि माणुसकीने मेलेल्या या भूतांना असा हिसका दाखवावाच लागतो. त्या लेकरांची आई तर परत येऊ शकत नाही पण त्या लेकरांना न्याय मिळायलाच हवा. असं ट्विट करत चित्रा वाघ यांनी भाजप महिलांची बाजू घेतली होती.
भाजपच्या महिला आघाडीने घेतलेली भूमिका भाजपच्याच खासदारांना न पटल्याने त्यांनी पत्र लिहून नाराजी व्यक्त केली. त्यानंतर पुन्हा शहराध्यक्ष धीरज घाटेंनीही महिला आघाडीकडून झालेली तोडफोड ही स्वाभाविक प्रतिक्रिया असल्याचे म्हणत खासदारांच्या भूमिकेला फारसे गांभीर्याने घेतलं नाही. आता या मुद्द्यावरून भाजपचा अंतर्गत राजकारणही चव्हट्यावर आलंय अशा प्रतिक्रिया उमटू लागल्यात.