धायरी : मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरीलअपघातप्रवण ठरलेल्या नवले पूल परिसरात वारंवार होणाऱ्या भीषण अपघातांच्या मालिकेमुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी आज शनिवारी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या विरोधात एक अनोखे आणि तीव्र आंदोलन केले. नुकत्याच झालेल्या अपघातात निष्पाप आठ जणांचा बळी गेला, त्याच ठिकाणी सामाजिक नागरिकांनी प्रतीकात्मक ‘दशक्रिया विधी’ आंदोलन करत प्रशासनाच्या उदासीनतेचा आणि निष्काळजीपणाचा निषेध नोंदवला.
नवले पूल परिसर गेल्या अनेक वर्षांपासून ‘मृत्यूचा सापळा’ बनला आहे. नवीन कात्रज बोगद्याकडील तीव्र उतार आणि रस्त्याच्या रचनेतील दोष हेच या अपघातांचे मुख्य कारण असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. मागील काही वर्षांत या मार्गावर झालेल्या अपघातांमध्ये शेकडो जणांचा बळी गेला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात निष्पाप जीव गमावूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून कोणताही कायमस्वरूपी आणि ठोस उपाय योजण्यात आला नाही.
प्रशासनाने केवळ रम्बलर पट्ट्या बसवणे, वेगमर्यादा निश्चित करणे यांसारख्या तात्पुरत्या उपाययोजना केल्या, ज्या या जीवघेण्या उतारावर पूर्णपणे अपयशी ठरल्या आहेत. महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी पाहणी करतात, आश्वासने देतात, पण रस्त्याच्या मूळ रचनेत बदल करण्याच्या महत्त्वाच्या प्रस्तावनेला केराची टोपली दाखवली जात असल्याचा नागरिकांचा थेट आरोप आहे. प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळेच अपघातांची मालिका थांबत नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
प्रतीकात्मक दशक्रिया; प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न...
नुकत्याच झालेल्या अपघातात लहान मुलांसह आठ जणांचा बळी गेला. या घटनेनंतर संपूर्ण परिसर शोकाकुल झाला आहे. याच पार्श्वभूमीवर, भूपेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी एकत्र येत अपघाताच्या ठिकाणी प्रतीकात्मक दशक्रिया विधीचे आयोजन केले. प्रशासनाला जागे करून, नागरिकांच्या जिवाची किंमत दाखवून देण्यासाठी हे तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. हा अपघात नसून प्रशासनाने केलेला खून आहे, अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांनी निषेध व्यक्त केला.
आंदोलकांच्या मुख्य मागण्या
रस्त्याच्या रचनेत बदल : नवीन कात्रज बोगद्यापासून सुरू होणारा तीव्र उतार आणि वळण त्वरित कमी करून रस्त्याची रचना अपघातमुक्त करावी.सेवा रस्ते पूर्ण करा : अपूर्ण असलेले सेवा रस्ते त्वरित पूर्ण करून स्थानिक वाहतुकीसाठी खुले करावेत.अवजड वाहनांसाठी स्वतंत्र उपाययोजना : जड वाहनांसाठी ब्रेक तपासणी केंद्र आणि नियंत्रण कक्ष स्थापन करावा.निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई : वारंवारच्या अपघातांना जबाबदार असणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत.नवीन एलिव्हेट पूल करणे : कात्रज बोगदा ते वारजे पूल किंवा स्वामिनारायण मंदिर ते वारजे एलिव्हेट पूल त्वरित करणे गरजेचे आहे.
Web Summary : Fed up with frequent accidents, citizens staged a mock funeral for authorities at Navale Bridge, a known accident spot. They demand road redesign, service road completion, heavy vehicle control, and action against negligent officials.
Web Summary : बार-बार होने वाली दुर्घटनाओं से तंग आकर नागरिकों ने नवले पुल पर अधिकारियों का प्रतीकात्मक अंतिम संस्कार किया। उन्होंने सड़क पुन: डिजाइन, सर्विस रोड पूरा करने, भारी वाहन नियंत्रण और लापरवाह अधिकारियों के खिलाफ कार्रवाई की मांग की।