भोर-कापूरहोळ मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी; आठ ते दहा किलोमीटरपर्यंत रांगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 18:53 IST2026-01-11T18:52:49+5:302026-01-11T18:53:03+5:30
भोर शहरातील नागरिकांना आणि पुणे-मुंबईकडे व महामार्गावर जाणाऱ्या प्रवाशांना होत आहे.

भोर-कापूरहोळ मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी; आठ ते दहा किलोमीटरपर्यंत रांगा
भोर : रविवार सुट्टीचा दिवस आणि मांढरदेवी यात्रा यामुळे भोर कापूरहोळ महामार्गावर मोठ्या प्रमाणात आठ ते दहा किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत, परिणामी वाहतूक कोंडी झाली आहे. याचा नाहक त्रास भोर शहरातील नागरिकांना आणि पुणे-मुंबईकडे व महामार्गावर जाणाऱ्या प्रवाशांना होत आहे.
रविवार सुट्टीचा दिवस असल्याने आणि काळूबाई मांढरदेवीची यात्रा संपल्याने, पोलीस प्रशासनाचा ताण नसल्याने मांढरदेवीला जाण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने सकाळपासूनच येत आहेत. भोर कापरहोळ रस्त्यावरील बुवासाहेबवाडी ते भोलावडेच्या दरम्यान सुरू असलेले रस्त्याचे अर्धवट काम आणि चौपाटी परिसरातील अरुंद रस्ता यामुळे भोर शहरासह भोर कापूरहोळ रस्त्यावर सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अनेकजण शिंदेवाडी रस्त्याने भोरकडे येत आहेत, मात्र तेथील रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे त्या मार्गावरही वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
त्यातच भोर शहरामध्ये बैलगाडा शर्यतीचे आयोजन असल्याने दोन-तीनशे बैलगाड्या भोरकडे येत होत्या. याशिवाय अनेक वाहने भोर शहरातूनही जात असल्यामुळे शहरातही वाहतूक कोंडी झाली होती. चौपाटी परिसरात पोलिसांनी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नियोजन केले होते. दरम्यान, सर्वच मार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याने पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना आणि ग्रामीण भागात जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.