विवाहित महिला प्रियकराच्या घरी वास्तव्यास; दोघांमध्ये वाद, महिलेचा गळा चिरून खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 16:58 IST2025-11-14T16:58:29+5:302025-11-14T16:58:45+5:30
अनैतिक संबंधातून ४६ वर्षीय विवाहित महिलेचा तिच्या प्रेमीने धारदार हत्याराने गळा चिरून निर्घृण खून केला

विवाहित महिला प्रियकराच्या घरी वास्तव्यास; दोघांमध्ये वाद, महिलेचा गळा चिरून खून
राजगुरुनगर : शिरोली (शिंदेवस्ती), (ता. खेड) येथे एका अनैतिक संबंधातून ४६ वर्षीय विवाहित महिलेचा तिच्या प्रेमीने धारदार हत्याराने गळा चिरून निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना गुरुवारी (दि. १३) रात्रीच्या सुमारास घडली. खेड पोलिस ठाण्यात या खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मृत महिलेचे नाव रूपाली विलास वाडेकर (वय ४६, रा. कल्याण, जि. ठाणे) आहे. ती मूळची ठाणे जिल्ह्यातील असून, गेल्या काही दिवसांपासून ती खेड येथील प्रेमीच्या घरी वास्तव्यास होती. आरोपी ललित दीपक खोल्लम (वय ३७, रा. शिंदेवस्ती शिरोली, ता. खेड) याच्याशी रूपालीचे अनैतिक संबंध होते. दोघांमध्ये सतत वादविवाद होत होते. या रागातून ललितने रूपालीचा गळा चिरून खून केल्याचा प्राथमिक संशय आहे.
रात्री उशिरापर्यंत दोघांमधील भांडणाचे काही आवाज शेजाऱ्यांनी ऐकले होते. चौकशीनंतर सव्वा अकरा वाजता रक्तबंबाळ अवस्थेत रूपालीचा मृतदेह आढळल्यामुळे खेड पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार सुदर्शन माताडे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. याप्रकरणी ललित खोल्लम याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.