चेन्नईतील फोटोग्राफरची फसवणूक; महागड्या कॅमेऱ्यांसह १३ लाखांचे साहित्य चोरीला 

By नितीश गोवंडे | Updated: January 24, 2025 20:30 IST2025-01-24T20:30:35+5:302025-01-24T20:30:58+5:30

चोरट्यांनी राघवेंद्र यांच्या भावाच्या मोबाईलवर संपर्क साधला.

Marijuana worth Rs 16 lakh seized in Loni Kalbhor | चेन्नईतील फोटोग्राफरची फसवणूक; महागड्या कॅमेऱ्यांसह १३ लाखांचे साहित्य चोरीला 

चेन्नईतील फोटोग्राफरची फसवणूक; महागड्या कॅमेऱ्यांसह १३ लाखांचे साहित्य चोरीला 

पुणे : ‘प्री वेडिंग शूट’च्या आमिषाने चेन्नईतील एका फोटोग्राफर तरुणाची फसवणूक करण्यात आली. पुणे आणि गोव्यात फोटोशूट करण्याचे आमिष दाखवून फोटोग्राफरला पुण्यात बोलवून घेतले. पुणे स्टेशन परिसरातील एका लाॅजमधून तीन कॅमेरे, लेन्स, तसेच अन्य साहित्य असा १२ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून चोरटे पसार झाले.

याप्रकरणी दोन चोरट्यांविरोधात बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत छायाचित्रकार राघवेंद्र एम. गोकुळ (२९. रा. शांतीनगर, व्यासरपाडी, चेन्नई, तामिळनाडू) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जानेवारी रोजी चोरट्यांनी राघवेंद्र यांच्या भावाच्या मोबाईलवर संपर्क साधला. पुणे आणि गोव्यात ‘प्री वेेडिंग शूट’ करायचे आहे. राहण्याची तसेच प्रवास खर्चाची व्यवस्था करण्यात येईल. या कामाचे तीन लाख रुपये देण्यात येतील, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखवले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना ऑनलाइन पद्धतीने सुरुवातीला १९ हजार रुपये पाठवले.

२२ जानेवारी रोजी पहाटे राघवेंद्र आणि त्यांचा भाऊ गोविंदाराजू चेन्नईहून विमानाने पुण्यात आले. त्यानंतर पुणे स्टेशन परिसरातील एका लाॅजमध्ये राहण्याची व्यवस्था केली असल्याचे त्यांना सांगण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी आठच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्यात आला. कोंढवा येथील व्यक्तीचे काम आहे. त्याला भेटण्यासाठी कोरिएंथन क्लबजवळ जायचे आहे, असे चोरट्यांनी त्यांना सांगितले. त्यानुसार राघवेंद्र आणि त्यांचा भाऊ तेथे गेले. तेव्हा चोरट्याचा मोबाईल बंद असल्याचे लक्षात आले. तासभर तेथे थांबल्यानंतर दोघे जण पुन्हा पुणे स्टेशन परिसरातील लाॅजवर आले. तेव्हा लाॅजमधील खोलीतून तीन कॅमेरे, लेन्स व अन्य साहित्य चोरीला गेल्याचे लक्षात आले. राघवेंद्र यांनी या घटनेची माहिती लाॅज व्यवस्थापकाला दिली. लाॅजमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तेव्हा एक जण लाॅजमधील खोलीतून कॅमेरे आणि अन्य साहित्य घेऊन निघाल्याचे आढळून आले. लाॅजमधील खोली आरक्षित करण्यासाठी दिलेल्या आधारकार्डची तपासणी करण्यात आली. तेव्हा आधारकार्डवरील चोरट्यांचा पत्ता तेलंगणा येथील निजामाबाद आणि नागपूरमधील असल्याचे आढळून आले. राघवेंद्र यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश चव्हाण करत आहेत.

Web Title: Marijuana worth Rs 16 lakh seized in Loni Kalbhor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.