Video : मुंबईत मराठा बांधव उपाशी राहू नयेत;अमित ठाकरे यांचं सरकारला आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 14:00 IST2025-09-01T14:00:30+5:302025-09-01T14:00:54+5:30
- मुंबईत आलेल्या मराठा बांधवांपर्यंत अन्न व पाणी पोहोचले पाहिजे, हे सरकारचे कर्तव्य आहे. ते पुढे म्हणाले, सरकारने आंदोलनाकडे गांभीर्याने पाहावे.

Video : मुंबईत मराठा बांधव उपाशी राहू नयेत;अमित ठाकरे यांचं सरकारला आवाहन
पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी पत्नी व मुलासह पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाच्या चरणी प्रार्थना करून सगळ्यांचे भलं होऊ दे असे साकडे घातले. यानंतर माध्यमांशी बोलताना अमित ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य केले. विशेषतः सुरू असलेल्या मराठा आंदोलनाबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
अमित ठाकरे म्हणाले, आमची भूमिका बदललेली नाही. जरांगे यावेळी परत आले आहेत, तर त्यांना आधी दिलेली आश्वासने कोणाने दिली होती, ती पाळली का ? हा प्रश्न आहे. जनतेला फसवले जात आहे का ? हे लोकांनी विचारायला हवे. आमची भूमिका अजूनही स्पष्ट आहे. मात्र, मुंबईत आलेल्या मराठा बांधवांपर्यंत अन्न व पाणी पोहोचले पाहिजे, हे सरकारचे कर्तव्य आहे. ते पुढे म्हणाले, सरकारने आंदोलनाकडे गांभीर्याने पाहावे. काही तरी मार्ग काढून लवकर तोडगा काढावा. मराठा बांधव ज्या मागण्या करत आहेत, त्या तांत्रिकदृष्ट्या शक्य आहेत का, हे स्पष्ट करणे आवश्यक आहे. आरक्षण मिळाले तर शिक्षण व रोजगार क्षेत्रात त्याचा कसा फायदा होईल, हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे. असेही ते म्हणाले. फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मुंबईत काही अनुचित घडावे, असे त्यांनाही वाटत नाही. योग्य निर्णय घेण्याची जबाबदारी त्यांची आहे. आणि ते निर्णय योग्य पद्धतीने घेतील, असा मला विश्वास आहे. असा विश्वास अमित ठाकरे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईत सुरू केलेले उपोषण सोमवारीही कायम आहे. मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांचे एक पथक आझाद मैदानावर आले. या पार्श्वभूमीवर मुंबईत अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. यातच मनोज जरांगे यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.