पुण्यात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक; महावितरणची भरती प्रक्रिया पाडली बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 15:58 IST2020-12-02T15:45:46+5:302020-12-02T15:58:22+5:30
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महावितरणच्या रास्ता पेठ मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन

पुण्यात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक; महावितरणची भरती प्रक्रिया पाडली बंद
पुणे : मराठा आरक्षणाच्या कारणावरून महावितरणने थांबवलेली मराठा समाजाच्या पात्र उमेदवारांची नियुक्ती त्वरित करावी, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महावितरणच्या रास्ता पेठ मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक भूमिका घेत राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत अर्ज पडताळणी प्रक्रिया बंद पाडली.
पुण्यातील रास्ता पेठ येथे असलेल्या महावितरणच्या कार्यालयात मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह पात्र उमेदवार देखील हजर झाले होते. त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलकांनी प्रवेशद्वारासमोर महावितरण आणि राज्य सरकारच्या निषेधार्ह घोषणाबाजी केली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, अशोक चव्हाण यांनाही घोषणांमधून लक्ष्य करण्यात आले. यावेळी अर्ध्या तासाच्या आंदोलनानंतर पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. अधीक्षक अभियंता प्रकाश राऊत यांनी निवेदन स्वीकारले. मराठा मोर्चाचे मागणीपत्र पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.
काय आहे प्रकरण...?
महावितरणने जुलै २०१९ मध्ये उपकेंद्र सहाय्यक पदाच्या भरतीची जाहिरात दिली होती. त्या पदाची ऑनलाइन परीक्षा चाचणी २५ ऑगस्टला घेण्यात आली. मात्र नंतर कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर पात्र उमेदवारांची निवड यादी २८ जून २०२० ला जाहीर करण्यात आली. महावितरणने मात्र त्यावेळी भरती प्रक्रिया राबविताना मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने ही भरती प्रक्रिया राबवली होती. त्यात मराठा समाजातील ४९५ उमेदवार पात्र ठरले होते. परंतु, दरम्यानच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देऊन हा विषय घटनापीठाकडे सोपवला आहे. त्याचा आधार घेत महावितरणने पात्र उमेदवारांसह सर्वच भरती प्रक्रिया थांबवली आहे. लेखी परीक्षा, वैद्यकीय परीक्षा यात उत्तीर्ण झालेल्या मराठा समाजाच्या सर्व पात्र उमेदवारांना तत्काळ नियुक्ती द्यावी, अशी मराठा क्रांती मोर्चाची मागणी आहे.