महाराष्ट्र घडवणारी शाहिरांची मांदियाळी सरकार दरबारी आजही उपेक्षितच..!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 07:12 AM2020-08-01T07:12:47+5:302020-08-01T10:39:58+5:30

महाराष्ट्राची जडणघडण पाहिली, तर लोकशाहिरांचे योगदान डोळ्यांसमोर उभे राहते

Many citizens who are going to form Maharashtra is still neglected by government..! | महाराष्ट्र घडवणारी शाहिरांची मांदियाळी सरकार दरबारी आजही उपेक्षितच..!

महाराष्ट्र घडवणारी शाहिरांची मांदियाळी सरकार दरबारी आजही उपेक्षितच..!

Next
ठळक मुद्देलोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती विशे

धनाजी कांबळे -

महाराष्ट्राला कलेची मोठी गौरवशाली परंपरा आहे. मात्र, आजही कलेच्या उपासकांच्या पदरी उपेक्षाच आलेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहिरांनी अतिशय महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. यात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, अमर शेख, गव्हाणकर अग्रस्थानी आहेत. या शाहिरांचे जन्मशताब्दी वर्ष आले, गेले तरीही त्यांच्या कार्यकतृत्त्वाचा म्हणावा तसा गौरव, सन्मान अजूनही झालेला नाही. १ आॅगस्ट २०२० अण्णा भाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष. मोजके उपक्रम वगळता केवळ परिसंवाद आणि प्रदर्शनातून त्यांना न्याय देता येणार नाही. एकीकडे वादग्रस्त ठरणाऱ्या व्यक्तीमत्त्वांना पुरस्कृत करून सरकार वाद ओढवून घेते. परंतु, ज्यांना निर्विवाद लोकमान्यता आहे, त्यांना वर्षानुवर्षे दुर्लक्षित आधुनिक गावकुसाबाहेरच ठेवले जाते. यामागे राजकारणच असेल, असे नाही. पण, त्यांचा यथोचित सन्मान व्हायला हवा, असे ज्या पक्ष-संस्था-संघटनांना वाटते, त्यांनी तरी पुढाकार घ्यायला हवा.
‘जग बदल घालुनि घाव... सांगुनी गेले मला भीमराव...’ असं गाणं लिहून आंबेडकरी चळवळीपासून अलिप्त राहणाऱ्य समाजाला चळवळीशी जोडून घेण्याचे आवाहन करणारे अण्णा भाऊ साठे. दीड दिवसाची शाळा शिकलेल्या अण्णा भाऊ साठे यांनी ३२ कादंब-या, १४ कथासंग्रह, ११ लोकनाट्य, १ प्रवासवर्णन, नाटके, कवने रचली आणि ते साहित्यसम्राट झाले.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, अमर शेख, द. ना. गव्हाणकर, वामनदादा कर्डक यांनी आपल्या शाहिरीतून महाराष्ट्र जागवला. आजही काही कलापथकं समाजप्रबोधनासाठी शाहिरीतून जागर करत आहेत. त्यातून कलेचं महत्त्व अधोरेखित होते. ‘शाहिराचं एक गाणं माझ्या शंभर भाषणांपेक्षा प्रभावी ठरतं,’ असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत. महाराष्ट्राची जडणघडण पाहिली, तर लोकशाहिरांचे योगदान डोळ्यांसमोर उभे राहते. लोकभाषेत जगण्याचं तत्त्वज्ञान मांडण्याचं काम शाहिरांनी केलं आहे. जातीधर्माच्या पलीकडे जाऊन दु:खाला अक्षरबद्ध करण्याचे काम अण्णा भाऊ साठे यांनी केले आहे. तरीही त्यांचा यशोचित सन्मान झाला नाही. अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न देण्याच्या मागणीबाबत आजही सरकारी उदासीनता दिसते.
असंच एक दुसरं व्यक्तिमत्त्व म्हणजे शाहीर अमर शेख. बार्शी हे त्यांचं जन्मगाव. महाराष्ट्राला पहाडी आवाजाने परिचित असलेल्या लोकशाहीर अमर शेख यांचे पोवाडे आणि गीते सादर करण्याची पद्धत आक्रमक होती. शाहिरीची प्रचंड ताकद असलेल्या या क्रांतिकारी शाहिराने आपली कला ही जनतेच्या सुखासाठी, सामान्य जनतेचा स्वाभिमान जागवण्यासाठी अव्याहतपणे जोपासली. मात्र कधीही आपल्या कलेचे भांडवल न करता स्वाभिमानाने हा शाहीर अखेरपर्यंत गात राहिला. त्यांचाही सन्मान झाला नाही. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, गोवा मुक्ती आंदोलन असो किंवा गिरणी कामगारांचा प्रश्न असो, त्यांच्या लेखणीने आणि आवाजाने समाजाला जागे केले. पोवाडे, गीते, लोकगीते, लोकनाट्ये लिहून त्यांनी विचारांचा प्रसार केला. अमर शेख नुसते कवी नव्हते; तर आपले आतडे पिळवटून लिहिलेली कविता पेश करणारे दमदार आणि करारी शाहीर होते.

तसेच शाहीर आत्माराम पाटील यांचेही योगदान महत्त्वाचे आहे. आत्माराम पाटील यांचा जन्म  कपासे (जि. पालघर) येथे झाला. त्यांनी ७० पोवाडे, २० वीर रसात्मक लावण्या, १५ समरगीते, १ गोंधळ, १०५ ओव्या असलेले क्रांतिपुराण, २५० समूहगीते-गाणी लिहिली. त्यांच्याबरोबरीने संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ज्यांनी आपल्या डफावर थाप देऊन महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात पोहोचवली ते द. ना. गवाणकर. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि शाहीर अमर शेख यांचे ते विश्वासू सहकारी. महागोंड (ता. आजरा) हे त्यांचे जन्मगाव. श्रमिक कष्टकरी जनतेसाठी आपलं आयुष्य देणाऱ्या या लोकशाहिरांचा सन्मान तर झालाच नाही, उलट त्यांच्या वाट्याला उपेक्षा आली. त्यांची देदीप्यमान शाहिरी आणि कला उजागर करण्यासाठी दोन वर्षाांपासून लोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मृती पुरस्कार देण्याचा निर्णय आजऱ्या तील काही परिवर्तनवादी मंडळींनी घेतला आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना हा पुरस्कार देण्यात आला. सरकारही वर्षानुवर्षे विविध पुरस्कार देते. त्यापैैकी एकाही पुरस्कारासाठी या शाहिरांची पात्रता सरकारला वाटत नाही काय? धनदांडग्या धनिकांना पोसण्यापेक्षा कष्टकरी श्रमिक जनतेच्या पोटाचा प्रश्न सुटावा, महाराष्ट्राचा प्रश्न सुटावा म्हणून ज्यांनी आयुष्य खर्ची घातलं त्या शाहिरांचा सरकारने सन्मान करावा, तीच त्यांच्या कामाची पोचपावती ठरेल.

Web Title: Many citizens who are going to form Maharashtra is still neglected by government..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे