पोटच्या मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्या नराधमाला ५ वर्षे जेलची हवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 09:45 IST2025-07-11T09:43:59+5:302025-07-11T09:45:01+5:30
आईला मुलगी सातत्याने नैराश्यात दिसायची. ती कुणाशी बोलत नव्हती. त्यामुळे आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता तिने सर्व सांगितले

पोटच्या मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्या नराधमाला ५ वर्षे जेलची हवा
पुणे : पोटच्या मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्या नराधमाला विशेष न्यायालयाने पाच वर्ष सश्रम कारावास व २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश (पोक्सो) कविता शिरभाते यांनी हा निकाल दिला. दंडाची रक्कम पीडितेला देण्यात यावी. दंड न भरल्यास आरोपीला दोन महिने साध्या कारावासाची शिक्षा द्यावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
पीडिता ही ११ वर्षांची आहे. आईला मुलगी सातत्याने नैराश्यात दिसायची. ती कुणाशी बोलत नव्हती. त्यामुळे आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता, मुलीने आईला सर्व प्रकार सांगितला. आईने वडिलांना याचा जाब विचारला असता, त्यांनी मुलीचा केवळ ड्रेस नीट करत होतो. आईला सांगू नको, अशी कोणतीही धमकी दिली नसल्याचे सांगितले. तेव्हा मुलीने हा प्रकार खूप वर्षांपासून चालला असल्याचे सांगितल्यावर आईने पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली.
त्यानुसार वडिलांवर वारजे पोलिस ठाणे येथे भा.दं.वि. कलम ३५४ अ (१) (अ) आणि पोक्सो कायदा कलम ७, ८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सरकारी वकील नितीन कोंघे यांनी युक्तिवाद केला की, आरोपी हा मुलीचा जन्मदाता बाप आहे. पीडितेवर आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. त्यामुळे आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. पोलिस उपनिरीक्षक एस. एस. कथले यांनी तपासी अधिकारी म्हणून तर वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगुडे, पोलिस निरीक्षक नीलेश बडाख तसेच पोलिस हवालदार सुशांत फरांदे, पोलिस हवालदार आढाव आणि पोलिस अंमलदार म्हातारमारे यांनी काम पाहिले.