वाकडं करून मग सरळ ? दत्ता भरणेंच्या वक्तव्यावर रोहित पवारांची खोचक टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 11:12 IST2025-08-02T11:11:08+5:302025-08-02T11:12:02+5:30
- वाकडं काम करून परत सरळ करणं लक्षात राहतं, कृषीमंत्री दत्ता भरणे यांचं विधान; रोहित पवारांची जोरदार टीका

वाकडं करून मग सरळ ? दत्ता भरणेंच्या वक्तव्यावर रोहित पवारांची खोचक टीका
पुणे - राज्याचे नवे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महसूल दिनानिमित्त इंदापूर येथे केलेल्या भाषणात वादग्रस्त विधान करून उपस्थितांचं लक्ष वेधलं. महसूल अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना भरणे म्हणाले, "सरळ काम सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करतात, त्याची माणसं नोंद ठेवतात." या वक्तव्यानंतर सभागृहात क्षणभर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.
या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना तीव्र शब्दांत टीका केली. ते म्हणाले, कृषीमंत्री काय बोललेत? वाकडी कामं पण नंतर सरळ करावी लागतात म्हणे, महायुतीने महाराष्ट्राची तिजोरीच वाकडी केली आहे. वाकडं काम करण्यासाठी तुम्हाला कृषी खाते दिलं नाही. सरळ काम करणाऱ्यांच्या आम्ही पाठीशी आहोत. पण जर तुमच्याकडून वाकडं काही झालं, तर महाराष्ट्र माफ करणार नाही. भरणे यांच्या विधानामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
यावेळी त्यांनी पुण्यातून अनेक कंपन्या इतर राज्यात जात असल्याच्या मुद्द्यावर भाष्य केले रोहित पवार म्हणाले, तळेगाव चाकण या परिसरातील आणि कंपन्या इतर राज्यात जात आहेत, दरम्यान, काही नामांकित आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी हिंजवडीतील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे प्रकल्पाचे काम देण्यास स्पष्ट शब्दांत नकार देण्यास सुरुवात केली आहे. हिंजवडी आयटी पार्कची प्रतिमा अलीकडच्या काळात सुमार दर्जाच्या पायाभूत सुविधांमुळे डागाळू लागली आहे. रस्त्यांची दयनीय अवस्था, सकाळी आणि संध्याकाळी होणारी प्रचंड वाहतूक कोंडी यामुळे परिसरातील अनेक आयटी आणि अन्य कंपन्यांची आंतरराष्ट्रीय प्रकल्प पूर्ण करताना दमछाक होत आहे. नवीन प्रकल्प मिळविताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.