हातगाडी लावण्याच्या वादातून झालेल्या खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 20:41 IST2019-01-14T20:37:30+5:302019-01-14T20:41:46+5:30
हातगाडी लावण्याच्या वादातून येरवड्यात झालेल्या संदिप देवकर यांच्या निर्घृण खूनप्रकरणी मुख्यसूत्रधार जावेद अल्ताफ़ सैय्यद अखेरीस रविवारी रात्री येरवडा पोलिसांनी अटक केली

हातगाडी लावण्याच्या वादातून झालेल्या खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक
विमाननगर : हातगाडी लावण्याच्या वादातून येरवड्यात झालेल्या संदिप देवकर यांच्या निर्घृण खूनप्रकरणी मुख्यसूत्रधार जावेद अल्ताफ़ सैय्यद (वय ३१ रा. नवी खडकी गणेशनगर येरवडा ) याला अखेरीस रविवारी रात्री येरवडापोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने तपासासाठी १९जानेवारी पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या निर्घृण खूनाच्या गंभीर गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार जावेद सैय्यद हा तब्बल आठ दिवस फरार होता.गुन्ह्यातील मुख्यसूत्रधार फरार असल्यामुळे येरवडा पोलिसांना मोठी डोकेदुखी झाली होती.येरवडा पोलिसांसह गुन्हे शाखेची पथकं आरोपी जावेद याचा शोध घेत होती.अखेरीस जावेदला रविवारी (दि.१३ जानेवारी) वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते, गुन्हे निरीक्षक किरण बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशिल बोबडे, पोलिस उपनिरीक्षक रविंद्र गवारी, सहाय्यक फौजदार बाळू बहिरट यांनी लोहगाव परिसरातून सापळा रचून ताब्यात घेतले. रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली.
संदिप उर्फ अण्णा सुभाष देवकर (वय ४९रा.नवी खडकी,येरवडा) यांचा हातगाडी लावण्याच्या वादातून ६जानेवारीला डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करुन व नंतर रिव्हाँलवरने गोळ्या घालून निर्घृण खून करण्यात आला होता. खूनाच्या आदल्या दिवशी दि.५ जानेवारी रोजी गुन्ह्यातील मुख्यसुत्रधार जावेद सैय्यद व त्याचा साथीदार आरोपी गणेश बोरकर याने संदिप देवकर यांच्याशी हातगाडी लावण्यावरुन झालेल्या वादावादीतून जावेद याने "तूला बघून घेतो " असे म्हणून शिविगाळ व धमकावून निघून गेला होता.याच वादातून जावेद याने खूनाचा कट रचून इतर साथिदारांच्या मदतीने संदिप यांचा निर्घृण खून केला. गुन्हा करुन जावेदसह सर्व आरोपी फरार झाले होते. या गोळीबारासह झालेल्या निर्घृण खूनामुळे येरवड्यासह संपुर्ण परिसरात खळखळ उडाली होती. जावेद सैय्यद हा नवी खडकी येथील रहिवासी आहे.
एमआयएम पक्षांकडून त्याने मागील वर्षी येरवड्यातून पुणे महापालिकेची निवडणूक लढवली होती.पुणे शहरासह मुंबई व इतर भागातील विविध राजकिय पक्ष संघटनांच्या वरिष्ठ पदाधिकारी यांच्याशी त्याचे संबंध आहेत.गुन्हेगारी व व्यापारी क्षेत्रातील काही बड्या लोकांच्या देखिल तो संपर्कात असल्याचे समजते. येरवड्यातील संदिप देवकर यांच्या निर्घृण खूनाच्या कटाचा मुख्यसूत्रधार म्हणून त्याच्याविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. खूनाच्या घटनेनंतर जावेद फरार होता.या गंभीर गुन्ह्यात तब्बल आठ दिवसांनी त्याला येरवडा पोलिसांनी अटक केली.
याच गुन्हातील सहभागी आरोपी गणेश चौगुले उर्फ बोरकर, विशाल कांबळे, रोहित कोळी , मयूर सुर्यवंशी या चौघांना पुणेस्टेशन परिसरातून सापळा रचून येरवडा पोलिसांनी यापुर्वीच अटक केली आहे. मात्र गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार जावेद सैय्यद व आरोपी अशरफ पठाण हे दोघे तेव्हा फरार होते.अटकेनंतर अोळखपरेडसाठी त्यांना तात्काळ न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.फरार आरोपी अशरफ हा गुन्हा करुन अौरंगाबाद येथे फरार झाला होता. शनिवारी अशरफ़ला गुन्हे शाखेच्या युनिट ४ चे पोलिस निरीक्षक अंजुम बागवान व पथकाने ताब्यात घेतले. येरवडा पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला देखील तपासासाठी न्यायालयाने १९ जानेवारी पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अशरफ हा येरवडा परिसरातील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. येरवड्यातील निर्घृण खूनाच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींची संख्या आता सहा झाली असून गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशिल बोबडे करीत आहेत.