‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेत महाराष्ट्राचा विक्रम, गिनिज बुकात नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 19:16 IST2025-12-04T19:15:46+5:302025-12-04T19:16:19+5:30
एकाच महिन्यात ४५ हजार ९११ शेतकऱ्यांना लाभ

‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेत महाराष्ट्राचा विक्रम, गिनिज बुकात नोंद
पुणे : 'मागेल त्याला सौर कृषिपंप' योजनेत महाराष्ट्राने विश्वविक्रम केला आहे. महावितरणने एकाच महिन्यात ४५ हजार ९११ सौर कृषिपंप लावण्याचा विक्रम केला आहे. या विक्रमाची गिनिज बुकमध्ये यशस्वी नोंद झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. ५) गिनीज बुकतर्फे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा एमआयडीसीमध्ये ऑरिक सिटी मैदानावर होणार आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अपारंपरिक ऊर्जामंत्री अतुल सावे, संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट, ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र उपस्थित राहणार आहेत.
मागेल त्याला सौर कृषिपंप या योजनेत शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनल आणि कृषिपंप असा संच देण्यात येतो. या योजनेत राज्याने देशात आघाडी घेतली आहे. यात शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारकडून ३० टक्के, तर राज्य सरकारकडून ६० टक्के अनुदान मिळते. त्यामुळे केवळ १० टक्के रक्कम भरून सिंचनासाठी कृषिपंपासह संपूर्ण संच मिळतो. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना केवळ ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो.
राज्यात साडेदहा लाख सौर कृषिपंप बसविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे कृषिपंपासाठी पैसे भरून वीज जोडणीची प्रतीक्षा करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचा ‘पेड पेंडिंग’चा प्रश्न सुटणार आहे. ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेसाठी महावितरणने स्वतंत्र पोर्टलची निर्मिती केली आहे. सौर पॅनल्समधून २५ वर्षे वीजनिर्मिती होत असल्याने तेवढा काळ शेतकऱ्यांना कृषिपंपाचे वीजबिल येत नाही. हे पंप पारंपरिक वीजपुरवठ्यावर अवलंबून नसल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे दिवसा कधीही सिंचन करता येते. त्यामुळे दिवसा वीजपुरवठ्याची शेतकऱ्यांची मागणी पूर्ण होते.