पुणे : देशात सर्वाधिक आपत्कालीन परिस्थिती ओढावलेले राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाते. सह्याद्री, समुद्र किनारी भाग, विदर्भ, मराठवाडा या सर्व ठिकाणी सातत्याने आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते. खूप मोठा पाऊस, वादळे, दुष्काळ, दरड कोसळणे या कारणांमुळे महाराष्ट्र धोकादायक बनलेला आहे. आता तर शहरी भागात पूर येण्याचे प्रमाणही वाढत आहे. मुंबई-कोकण किनारपट्टीमध्ये आलेल्या पुरामुळे २०१८ ते २०२३ मध्ये १२४६ जणांना जीव गमवावा लागला, अशी माहिती रूरकी येथील आयआयटीच्या शास्त्रज्ञ प्रिथा आचार्य यांनी दिली.वॉटरशेड ऑर्गनायथेशनतर्फे दोन दिवसीय ‘हवामान बदल-२०२४७’ या विषयावर कार्यशाळा आयोजित केली आहे. त्याचे उद्घाटन गुरूवारी (दि.६) झाले. या वेळी पहिल्या सत्रात ‘आयआयटीएम’चे शास्त्रज्ञ डॉ. भुपेंद्र महादूर सिंग, प्रिथा आचार्य, भारती विद्यापीठ पर्यावरण विभागाचे संचालक डॉ. एरिक भरूचा यांनी मार्गदर्शन केले.
देशामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये उष्णतेच्या लाटा येत आहेत. त्यात महाराष्ट्राचा समावेश आहे. तापमान अधिक होतेय आणि त्यामुळे दुष्काळाची दाहकता वाढत आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर देखील होत आहे. कोविड काळामध्ये महाराष्ट्रात व त्यातही पुण्यामध्ये अधिक रूग्ण आढळून आले. त्यामुळे भविष्यातील हवामान बदलाचा अधिक धोका महाराष्ट्राला बसणार आहे. - प्रिथा आचार्य, शास्त्रज्ञ, आयआयटी-रूरकीपृथ्वीचे तापमान गेल्या १० वर्षामध्ये सर्वाधिक झाले आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीच्या घटना सातत्याने पहायला मिळत आहेत. पृथ्वी तप्त होऊ लागली आहे. या हवामान बदलामुळे सर्वच गोष्टींवर परिणाम होत आहे. वाढते औद्योगिकीकरण, जमीन वापराचा बदल, कृषी क्षेत्र यामुळे कार्बन उत्सर्जन अधिक होऊन उष्णता वाढत आहे. -डॉ. भुपेंद्र बहादूर सिंग, शास्त्रज्ञ, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपीकल मेट्रोलॉजी, पुणेपृथ्वीवरील जैवविविधता नष्ट होत आहे. मी लहान असताना २०० काळवीट पाहिलेले आहेत. पण आता मला दोन किंवा तीनच दिसतात. औद्योगिकीकरण प्रचंड वाढले आहे. गवताळ भागावर वृक्षारोपण केले जात आहे. शहरीकरणात वाढ होतेय. या सर्व गोष्टींमुळे जैवविविधता कमी कमी होऊ लागली. आताच हे रोखणे आवश्यक आहे. -डॉ. एरिक भरूचा, संचालक, भारती विद्यापीठ पर्यावरण विभाग, पुणे