Maharashtra Weather Update : सलग हुडहुडी भरविल्यानंतर गारठ्यात काहीशी घट होण्यास सुरूवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 10:53 IST2024-12-18T10:52:08+5:302024-12-18T10:53:03+5:30
थंडीत किंचित घट होण्यास सुरुवात झाली आहे.

Maharashtra Weather Update : सलग हुडहुडी भरविल्यानंतर गारठ्यात काहीशी घट होण्यास सुरूवात
पुणे : उत्तर भारतात थंडीची लाट तीव्र आहे. त्यामुळे उत्तरेतून शीतलहरी वेगाने राज्यात येत आहेत. मात्र, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात बाष्पयुक्त वारे येत आहेत. त्यामुळे थंडीत किंचित घट होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, मंगळवारी (दि.१७) अहिल्यानगर ५.६, तर पुणे शहरातील एनडीए भागाचा पारा ६.५ अंशांवर खाली आला होता.
जम्मू-काश्मीरपासून मध्य प्रदेशपर्यंतच्या भागात थंडीची लाट तीव्र आहे. या सर्व भागांत कडाक्याच्या थंडीचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, चंदीगड, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या भागांत पारा ० ते ६ अंशांवर आहे तर काश्मीरमध्ये उणे ५ इतके तापमान खाली गेले आहे. त्या भागातून शीतलहरी महाराष्ट्रात येत आहेत. मात्र, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे त्या भागातून राज्यात बाष्पयुक्त वारे येत आहे. या दोन्हींची टक्कर महाराष्ट्रात होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्यात १८ ते २१ डिसेंबरदरम्यान थंडीत किंचित घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
किमान तापमान...
अहिल्यानगर - ५.६, पुणे (एनडीए ६.५, शिवाजीनगर ८), नांदेड ७.६, नाशिक ८, जळगाव ८.४, वर्धा ९.५, गोंदिया ८.२, नागपूर ८.२, धाराशिव १०.२, छ.संभाजीनगर १०,परभणी ९.४, अकोला १०.५, सांगली ११.८, सातारा ९.१, सोलापूर १२.९, अमरावती ११.४, बुलढाणा ११.६, ब्रह्मपुरी ९.६, वाशिम १३.६, महाबळेश्वर १३.७, कोल्हापूर १४.६, मुंबई २०