पैलवान शिवराज राक्षेंची पंचांना मारहाण, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांची पहिली प्रतिक्रिया…
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 13:13 IST2025-02-03T13:11:36+5:302025-02-03T13:13:24+5:30
Maharashtra Kesari 2025 Controversy: शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारण्यावर महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांनी आपलं मत मांडलं

पैलवान शिवराज राक्षेंची पंचांना मारहाण, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांची पहिली प्रतिक्रिया…
Maharashtra Kesari 2025 Winner: अहिल्यानगर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ यांनी किताब पटकावला. मात्र, या स्पर्धेत पंचांच्या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला. पैलवान महेंद्र गायकवाड यांनी पंचांशी वाद घातला, तर शिवराज राक्षे यांनी थेट पंचांची कॉलर धरून त्यांना लाथ मारली.
या संपूर्ण प्रकारावर आज महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांनी भाष्य केले. आज त्यांनी पुण्यात दगडूशेठ बापाचे दर्शन घेतलं. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्र केसरी स्पर्धा लागलेल्या गालबोटाबद्दल त्यांनी प्रतिक्रिया दिली. शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारण्यावर महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांनी आपलं मत मांडलं
त्यांनी आपल्या विजयाचा आनंद व्यक्त करताना सांगितले की, “मी मेहनत घेतली, तयारी केली आणि आज अखेर महाराष्ट्र केसरी किताब जिंकण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले.” महाराष्ट्र केसरीची गदा पटकावल्यानंतर त्यांनी तालमीतील लोकांचे आणि पुणे जिल्ह्यातील सर्वांचे आभार मानले.
वादग्रस्त निकालावर पृथ्वीराज मोहोळ यांची प्रतिक्रिया
मोहोळ यांनी स्पष्ट केले की, “मी पंचांच्या निर्णयावर काही बोलणार नाही. निकाल सर्वांनी पाहिला आहे. मागील वर्षी माझ्यावर अन्याय झाला, पण मी संयम ठेवला आणि मेहनतीच्या जोरावर यंदा विजय मिळवला. पराजय स्वीकारण्याची ताकद हवी.”
शिवराज राक्षे यांनी पंचांना मारहाण केल्याच्या घटनेबाबत बोलताना मोहोळ म्हणाले, “मी खेळाडू आहे, राजकारणात मला रस नाही. पंचांचा निर्णय अंतिम असतो. मागील वेळी माझ्याबाबतीत असेच घडले, पण मी संयम ठेवला. पराजय स्वीकारला आणि तयारी करत पुन्हा विजय मिळवला. आता याही वेळेस तसेच व्हायला हवे.”
पुढील लक्ष्य: हिंद केसरी आणि भारत केसरी
पृथ्वीराज मोहोळ यांनी सांगितले की, “माझे पुढचे ध्येय हिंद केसरी आणि भारत केसरी बनण्याचे आहे. आता मी थेट घरी आईला भेटायला जाणार आहे. त्यानंतर पुढील तयारी सुरू करणार आहे.”
यावेळी पंचांच्या निर्णयावर राजकीय हस्तक्षेप होत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, याबाबत विचारले असता मोहोळ म्हणाले, “राजकारणाचा मला काही संबंध नाही. मी फक्त मेहनत करून माझे लक्ष्य गाठत राहणार आहे.”