LPG Gas Crisis : 'फूड डिलिव्हरी बॉइज'च्या आयुष्यात आखातातील संघर्षामुळे आर्थिक युद्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 13:31 IST2026-03-18T13:29:56+5:302026-03-18T13:31:08+5:30
- ऑर्डर्स घटल्याने कमाई निम्म्यावर : हॉटेल्स आणि क्लाउड किचन बंद पडू लागली; परिस्थिती सुधारली नाही, तर बेरोजगारीची टांगती तलवार; घरखर्च, बाइकचे हप्ते अन् पेट्रोल न परवडणारे

LPG Gas Crisis : 'फूड डिलिव्हरी बॉइज'च्या आयुष्यात आखातातील संघर्षामुळे आर्थिक युद्ध
- आकाश झगडे
पिंपरी : शहरात दिवस-रात्र धावणाऱ्या फूड डिलिव्हरी बॉइजच्या आयुष्यात सध्या आर्थिक युद्ध सुरू झाले आहे. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर शहरात हॉटेल्स आणि क्लाउड किचन बंद पडू लागल्याने, डिलिव्हरी बॉइजच्या दररोजच्या कमाईत ४० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. घरखर्च, बाइकचे हप्ते आणि पेट्रोलचे दर यामुळे त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ आली आहे.
युद्धजन्य परिस्थितीच्या आधी डिलिव्हरी बॉय दिवसाला सरासरी १० ते १२ तासांच्या कामात ८०० ते १२०० रुपये कमवत. तीस टक्के हॉटेल्स बंद झाल्याने ग्राहकांनी ऑनलाइन जेवण मागवणे कमी केले आहे. पूर्वी तासाला ३-४ ऑर्डर्स मिळायच्या, तिथे आता २-३ तास वाट पाहून एकही ऑर्डर मिळत नाही. सध्या त्यांची दिवसाची कमाई ३०० ते ४०० रुपयांपर्यंत खाली आली आहे. यातून पेट्रोलचा खर्च वजा केल्यास हातात जेमतेम २०० रुपये उरत आहेत.
हप्ते आणि कौटुंबिक जबाबदारीचे ओझे
बहुतांश डिलिव्हरी बॉइजनी कर्ज काढून दुचाकी घेतल्या आहेत. उत्पन्नात पन्नास टक्के घट झाल्याने बाइकचे हप्ते थकण्याची भीती निर्माण झाली आहे. अनेक तरुण ग्रामीण भागातून शहरात आले आहेत. रूमचे भाडे आणि मेसचा खर्च भागवणे आता त्यांना अशक्य होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मी फूड डिलिव्हरीचे काम करत आहे. आधी लॉगिन केले की, १०-१५ मिनिटांत ऑर्डर यायची. आता लवकर ऑर्डर येत नाही. बाहेर बसून राहावे लागत आहे. - स्वप्नील लोंढे, डिलिव्हरी पार्टनर.
आमचे गणित साधे आहे, जास्त ऑर्डर्स म्हणजे जास्त कमाई. पण, आता दिवसभर उन्हातान्हात फिरूनही हातात जेमतेम ४००-५०० रुपये पडतात. त्यातले अर्धे पैसे बाइकच्या पेट्रोलमध्येच जातात. हातावर पोट असणाऱ्यांवर याचा जास्त परिणाम होत आहे. - अक्षय वाघामारे, डिलिव्हरी पार्टनर.