प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 19:08 IST2025-12-24T19:07:44+5:302025-12-24T19:08:07+5:30
नातेवाईक, मित्रमंडळी आणि घरच्यांनी दोघांतील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यश आले नाही

प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
पुणे: प्रेमविवाहानंतर आयुष्य खरंतर सुखकर व्हायला हवे. एकमेकांचे स्वभाव, आवडी निवडी आधीच माहिती असल्याने गोडीगुलाबीचा संसार व्हायला हवा. पण एका प्रेमविवाह केलेल्या दाम्पत्याच्या आयुष्यात झाले उलटेच. प्रेमविवाहानंतर दुसऱ्या दिवसापासून दोघांमध्ये वाद सुरू झाला अन् ते वेगळे राहू लागले. अखेर या उच्चशिक्षित दाम्पत्याचा घटस्फोट ८ दिवसांत मंजूर झाला. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश बी. डी. कदम यांनी हा निकाल दिला आहे.
दि. ३ डिसेंबरला दाखल केलेला दावा १० डिसेंबरला निकाली निघाला. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्यानुसार परस्पर संमतीने घटस्फोटाचा दावा दाखल करण्यापूर्वी दोघे १८ महिन्यांपासून वेगळे राहत असल्यास ६ महिन्यांचा कालावधी वगळता येतो. या प्रकरणात दोघे १८ महिन्यांपासून वेगळे राहत आहेत. त्यामुळे हा कालावधी वगळण्याची मागणी अर्जदार वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने हा निकाल दिला आहे. राकेश (वय ३४) आणि स्मिता (३०) (नावे बदलली आहेत) अशी त्या दोघांची नावे आहेत. दोघांनी ॲड. राणी कांबळे-सोनावणे यांच्यामार्फत कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. दोघेही उच्चशिक्षित आहे. तो शिपवर कामाला आहे तर ती डॉक्टर आहे. १८ महिन्यांपूर्वी दोघांचा प्रेमविवाह झाला. त्याच्या शिपवरील कामावर जाण्यावरून दोघांत लग्नाच्या दुसऱ्या दिवशी वाद झाले. दोघे वेगळे राहू लागले. नातेवाईक, मित्रमंडळी आणि घरच्यांनी दोघांतील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यश आले नाही. त्यामुळे परस्परसंमतीने घटस्फोट घेण्यावर दोघांचे एकमत झाले. त्याला शिपवर कामाला जायचे होते. त्यामुळे दोघांनी दाखल केलेला अर्ज न्यायालयाने लवकर निकाली निघाला. दरम्यान, लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू झालेले वाद मिटले नाहीत. दोघे एकत्र येणे शक्य नव्हते. त्यामुळे परस्पर संमतीने घटस्फोटासाठी दाखल केलेला अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे, असे ॲड. राणी कांबळे-सोनावणे यांनी सांगितले.