इथल्या समस्या बघता, आम्ही राहायचं की नाही? त्रस्त पुणेकर महिलेचा अजित पवारांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 15:39 IST2025-09-15T15:38:22+5:302025-09-15T15:39:58+5:30

नागरिकांनी फ्लॅट घेऊन जर बिल्डर लोकांना मस्ती आली असेल, तर जे आपल्या हातात आहे ती ॲक्शन घ्या, अजित पवार यांनी अधिकांऱ्यांना सांगितले

Looking at the problems here, should we stay or not? A distressed Pune woman asks Ajit Pawar. | इथल्या समस्या बघता, आम्ही राहायचं की नाही? त्रस्त पुणेकर महिलेचा अजित पवारांना सवाल

इथल्या समस्या बघता, आम्ही राहायचं की नाही? त्रस्त पुणेकर महिलेचा अजित पवारांना सवाल

पुणे: मुंढवा, केशवनगर परिसरातील विकासकामांची पाहणी करताना काही सोसायट्यांमध्ये नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याची तक्रार, रस्त्यांची अवस्था तर मोठ्या प्रमाणावर होणारी वाहतूककोंडी यांसह अन्य पुणेकरांच्या प्रश्नांच्या भडीमाराला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सामोरे जावे लागले. इथल्या समस्या बघता इथे राहायचं की नाही हा प्रश्न आम्हाला पडला आहे असे त्रस्त झालेल्या पुणेकर महिलेने सांगतानाच जसे गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर न सांगता रहदारीचा आढावा घ्यायचे तसेच तुम्ही फिरा असा सल्लासुद्धा दिला. त्यावर आम्हाला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. त्या कामांमध्ये अधिक कशी गती देता येईल, या कामांना प्राधान्य कसे देता येईल, हे पाहतो असे उत्तर अजित पवार यांनी दिले.

मुंढवा चौक, हडपसर गाडीतळ, खराडी ते केशवनगर उड्डाणपुलाच्या कामाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. यावेळी आमदार चेतन तुपे, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. उपस्थित होते. मुंढवा भागात पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांनी थेट अजित पवार यांच्याकडे गाऱ्हाणे घातले. त्यानंतर त्यांनी थेट महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी नंदकुमार जगताप यांना फोन केला आणि तातडीने त्यांना यायला सांगितलं. केशवनगर परिसरातील चौकांची आणि रस्त्यांची अजित पवार यांच्याकडून पाहणी करण्यात आली. त्यावर एक महिला अजित पवार यांच्या समोर समस्या मांडण्यासाठी आली. त्या म्हणाल्या आम्हाला खूप आशा आहेत. पर्रिकरांसारखे तुम्ही फिरावे त्यावर अजित पवार म्हणाले कोण पर्रिकर? त्यावर महिला म्हणाली, गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर दिवसा फिरायचे ट्रॅफिक बघण्यासाठी तसेच तुम्ही कधीतरी ट्रॅफिकचा टाईम असतो, त्यावेळी येऊन बघायला पाहिजे, असं नाही की माहिती होऊ शकत नाही असे महिलेने सांगितले. त्यावर अजित पवार म्हणाले, आम्ही प्रश्न विचारायला आलेलो नाही. मी स्वतः इथला परिसर ठीक व्हावा. सगळ्या समस्या सोडवल्या जाव्या यासाठी प्रयत्न करतोय. तुम्ही यायच्या आधी सगळ्या समस्या ऐकल्या आहेत. त्यांनी निवेदन दिलेले आहे. यामध्ये वेगवेगळ्या एजन्सी आल्या आहेत. पीएमसी आहे, पीएमआरडीए, आत्ताच नागरिकांना त्याचं देणं-घेणं नाहीये, त्यांना त्यांच्या सुविधा पाहिजे आहेत, त्याच्याशी शंभर टक्के सहमत आहे. त्या संदर्भामध्ये आमचं काम सुरू आहे. आम्हाला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. त्या कामांमध्ये अधिक कशी गती देता येईल, या कामांना प्राधान्यक्रम कसे देता येईल, हे पाहतो असे अजित पवार यांनी सांगितले.

पुण्यातील बिल्डरांनाही अजित पवारांचा इशारा

नागरिकांना समस्या येत असतील तर बिल्डरांचं काम थांबवा. नागरिकांनी फ्लॅट घेऊन जर बिल्डर लोकांना मस्ती आली असेल, तर जे आपल्या हातात आहे ती ॲक्शन घ्या असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकांऱ्यांना सांगितले.

दारूविक्रेत्यांना दिली तंबी

केशवनगर, मुंढवा परिसरात अवैध मद्यविक्री होत असल्याची तक्रार नागरिकांनी अजित पवार यांच्याकडे केली. यावेळी अधिकाऱ्यांना त्याबाबत आदेश देत असताना शहाणे बना आणि अवैध दारूविक्री बंद करा, अशी तंबी अजित पवार यांनी दिली. तसेच ज्याला दारू प्यायची आहे तो आपल्या घरी घेईल असा मिश्किल टोलेबाजीही अजित पवार यांनी केली.

Web Title: Looking at the problems here, should we stay or not? A distressed Pune woman asks Ajit Pawar.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.