स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका महायुती म्हणून लढावाव्यात - रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 19:47 IST2025-05-18T19:44:21+5:302025-05-18T19:47:24+5:30
महायुतीमधील सर्व घटक पक्षांच्या प्रमुखांना भेटून आपण ही भूमिका मांडणार आहोत. या निवडणुकांमध्ये आरपीआयला योग्य प्रतिनिधित्व मिळावे

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका महायुती म्हणून लढावाव्यात - रामदास आठवले
पुणे : प्रदीर्घकाळ रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात पार पाडाव्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. या निवडणुका भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि आरपीआय यांनी महायुती म्हणून एकत्रित लढवाव्या, अशी पक्षाची भूमिका असल्याचे मत आरपीआय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
महायुतीमधील सर्व घटक पक्षांच्या प्रमुखांना भेटून आपण ही भूमिका मांडणार आहोत. या निवडणुकांमध्ये आरपीआयला योग्य प्रतिनिधित्व मिळावे, अशी आग्रही आहे. पुणे महापालिका निवडणुकीत किमान १५ प्रभागात पक्षाला उमेदवारी मिळावी, संपूर्ण पाच वर्षासाठी उपमहापौर पद मिळावे. मागास प्रवर्गाचे आरक्षण आल्यास महापौर पद मिळावे, अशा प्रमुख मागण्या असल्याचे सांगीतले. त्यासंबंधी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी चर्चा झाली असून योग्य प्रतिसाद मिळेल, अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली.
भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभ परिसराच्या विकासासाठी शंभर ते दीडशे एकर जागा ताब्यात घेऊन जिल्हाधिकारी व सामाजिक न्याय विभागाने प्रस्ताव सादर करावा. त्यासाठी निधी मिळवून देण्यासाठी मदत करू, अशी ग्वाही आठवले यांनी दिली. यावेळी ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल भारतीय सैन्याचे अभिनंदन व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आरपीआयच्या वतीने राज्यातील सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी 'भारत जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद' रॅली काढण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी पक्षाचे राज्य सचिव बाळासाहेब जानराव, प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर, शहराध्यक्ष संजय सोनवणे, गंगाधर आंबेडकर, सूर्यकांत वाघमारे असित गांगुर्डे, शैलेंद्र चव्हाण, अशोक कांबळे, अशोक शिरोळे, मोहन जगताप, महिपाल वाघमारे, शाम सदफुले, संदीप धांडोरे, लियाकट शेख, रवी अवसरमल, अक्षय अवसरमल, उमेश कांबळे, आकाश बहुले आदि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
संजय राऊत यांना कोपरखळी
'नरकात स्वर्ग' निर्माण करणार्या खासदार संजय राऊत यांनी स्वर्गात जायचे की नरकात हे आधी ठरवावे. एकाच वेळी दोन्ही ठिकाणी जाता येणार नाही, अशी कोपरखळी आठवले यांनी मारली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनाम्याची मागणी हास्यास्पद आहे. त्यांना तसा अधिकार नाही. त्या ऐवजी त्यांनी २०२९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करावी, अशा शब्दात खिल्ली उडवली.