Local Body Election : चार नगरपरिषदांमध्ये निकाल लाडक्या बहिणींच्या हाती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 18:21 IST2025-12-03T18:20:23+5:302025-12-03T18:21:05+5:30
- पुरुषांपेक्षा महिलांचे मतदानाचे प्रमाण जास्त, एकूण मतदानात केवळ ५ हजारांचा फरक

Local Body Election : चार नगरपरिषदांमध्ये निकाल लाडक्या बहिणींच्या हाती
पुणे : जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या १२ नगरपरिषदा व तीन नगरपंचायतींच्या निवडणुकीत चार नगरपरिषदांमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहेत. त्यामुळे या चारही नगरपरिषदांमध्ये निकाल लाडक्या बहिणींच्या हाती असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर जिल्ह्यातील एकूण मतदानात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या केवळ पाच हजारांनी कमी आहे. त्यामुळे बहुतांश नगरपरिषदांमध्ये महिला मतदारांचा कल महत्त्वाचा ठरणार आहे. या निवडणुकीत जिल्ह्यात सरासरी ६८ टक्के मतदान झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा व तीन नगरपंचायतीची निवडणूक जाहीर करण्यात आली होती. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने बारामती व फुरसुंगी उरुळी देवाची या दोन नगरपरिषदांची मतदानाची तारीख पुढे ढकलली. त्यानंतर मंगळवारी (दि. २) उर्वरित १२ नगरपरिषदा व तीन नगरपंचायतींमध्ये मतदान घेण्यात आले. त्यात सरासरी ६८ टक्के मतदान झाले. एकूण ३ लाख ६ हजार ७२२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात १ लाख ५५ हजार ८३५ पुरुष तर १ लाख ५० हजार ८७६ महिला मतदारांचा समावेश आहे. तर अन्य ११ मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. या आकडेवारीवरून पुरुष व महिला मतदारांमध्ये केवळ पाच हजारांचा फरक आहे. त्यामुळे बहुतांश नगरपरिषदांमध्ये निकाल महिलांच्या मतदानावर अवलंबून असल्याचे दिसून येत आहे.
त्यातही लोणावळा इंदापूर जेजुरी व भोर या चार नगरपरिषदांमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदार पेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या चारही ठिकाणी निकाल महिला ठरविणार आहेत.
एकूण मतदारांचा विचार केल्यास तळेगाव दाभाडे नगर परिषदेत सर्वाधिक ६४ हजार ६७९ मतदार होते. त्यातील ३१ हजार ८४६ मतदारांनी मतदान केले. त्यात १६ हजार ५५५ पुरुष तर १५२९१ महिलांचा समावेश आहे. एकूण मतदारांच्या तुलनेत हे मतदान केवळ ४९.२४ टक्के इतके आहे. जिल्ह्यातील सर्वात कमी मतदान याच नगर परिषदेत झाले आहे. तर इंदापूर नगर परिषदेत सर्वाधिक ७९.८९ टक्के मतदान झाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. येथे एकूण मतदारांची संख्या २४ हजार ८२९ असून १९८३७ मतदारांनी मतदान करण्याचा हक्क बजावला. त्यात ९ हजार ७५० पुरुष व १० हजार ८३ महिला मतदारांचा समावेश आहे.
महिला मतदारांचे प्रमाण जास्त असलेल्या नगर परिषदा
नगर परिषद, पुरुष - महिला
लोणावळा १७१६२--१७३४९
इंदापूर ९७५०--१००८३
जेजुरी ५८९५--६४३६
भोर ६४२८--६४३७