ठाण्याप्रमाणे चांगल्या रस्त्यांसाठी पुण्यातही बांधकाम टीडीआरचा विचार करू; एकनाथ शिंदेची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 12:08 IST2025-06-07T12:08:09+5:302025-06-07T12:08:19+5:30

रस्त्यांमुळे शहरांची ओळख बनते, खड्डेमय रस्ते असल्यास शहराची प्रतिमा मलिन होते

Like Thane, we will consider construction TDR in Pune for better roads; Eknath Shinde assures | ठाण्याप्रमाणे चांगल्या रस्त्यांसाठी पुण्यातही बांधकाम टीडीआरचा विचार करू; एकनाथ शिंदेची ग्वाही

ठाण्याप्रमाणे चांगल्या रस्त्यांसाठी पुण्यातही बांधकाम टीडीआरचा विचार करू; एकनाथ शिंदेची ग्वाही

पुणे: रस्त्यांमुळे शहरांची ओळख बनते. रस्त्यांत खड्डे असल्यास त्या शहराची प्रतिमादेखील मलिन होते. त्यामुळे चांगले रस्ते बांधण्यासाठी ठाणे शहराप्रमाणे पुण्यातही बांधकाम टीडीआर देण्यासंदर्भात विचार करू. यातून अनेक सुविधांसह रस्तेदेखील बांधता येतील. त्यातून पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानीची सांस्कृतिक भूकदेखील भागेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. क्रेडाई पुणेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. 

शिंदे म्हणाले, “मुंबई, ठाणे शहरात होत असलेल्या विकासकामांमुळे येथे गुंतवणुकीचा वेग वाढला आहे. तसाच विकास पुण्याचादेखील होणे अपेक्षित आहे. त्यासाठी सुविधा पुरविणे आवश्यक असून मेट्रो, रस्ते यासारखी कामे राज्य सरकारतर्फे सुरू करण्यात आली आहेत. सार्वजनिक वाहतुकीची सुविधा निर्माण केल्यास सामान्य नागरिक त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. त्यातून वाहतूककोंडीसारखे प्रश्न सोडविण्यास मदत होते. त्यामुळे रस्ते चांगले असणे आवश्यक आहेत. रस्त्यांमुळे शहरांची ओळख बनते. खड्डेमय रस्ते असल्यास शहराची प्रतिमा मलिन होते. त्यामुळे सुविधा देताना बांधकाम टीडीआरसारखी ठाण्यात राबवण्यात आलेली योजना पुण्यातही राबवण्यासंदर्भात विचार करण्यात येईल.”

शासन व प्रशासन ही दोन महत्त्वाची चाके असून अधिकाऱ्यांनी ‘न होणारे काम कसे होईल हे सांगण्यासाठी कौशल्य अंगी कारावे.’ सामान्य माणसांना सुविधा देण्यासाठी काम करावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. क्रेडाईने सामाजिक बांधिलकी म्हणून कायमच मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोना काळात सामान्य माणसांना दिलेल्या सुविधा वाखाणण्याजोग्या आहेत. कोरोना काळात बांधकाम व्यवसाय ऑक्सिजनवर गेला होता. मात्र, तो व्हेंटिलेटरवर जाण्यापासून राज्य सरकारने थांबविले. त्यामुळे विकासकामे करताना त्यांच्याविषयी विचार करावा लागणार आहे. त्यांच्या अडचणी सोडविल्यास परवडणारी घरे सामान्यांना उपलब्ध होतील, असेही ते म्हणाले.

Web Title: Like Thane, we will consider construction TDR in Pune for better roads; Eknath Shinde assures