ऊसाच्या जंगलात बिबट्यांचा अड्डा, मानव-बिबट संघर्ष संपणार तरी कधी? २५ वर्षांत ५४ बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 13:41 IST2025-10-13T13:40:53+5:302025-10-13T13:41:59+5:30
वनविभागाच्या जुन्नर, ओतूर, मंचर, घोडेगाव, खेड, चाकण आणि शिरूर या परिक्षेत्रांपैकी जुन्नर तालुका हा संघर्षाचा केंद्रबिंदू ठरला आहे

ऊसाच्या जंगलात बिबट्यांचा अड्डा, मानव-बिबट संघर्ष संपणार तरी कधी? २५ वर्षांत ५४ बळी
राहुल गणगे
पुणे : पुणे जिल्ह्यात शिरूर, खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्यांमध्ये बिबट्यांची दहशत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मानवी वस्त्यांमध्ये बिबट्यांचा वावर वाढल्याने आणि बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटनांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत, ज्यामुळे पाळीव प्राणी तर काही वेळा माणसेही बळी पडत आहेत. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे रविवारी (दि. १२) भरदिवसा साडेपाच वर्षांच्या चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केल्याने तिची दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शिरूरसह परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पिंपरखेड आणि जांबूत या साधारण १० किलोमीटरच्या परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात मनुष्यहानी झाल्याची ही सातवी घटना आहे. बिबट्या आता माणसांना घाबरत नसून भरदिवसा हल्ले करत असल्यामुळे ‘मानव-बिबट संघर्ष संपणार तरी कधी?’, असा सवाल शिरूर, खेड, जुन्नर व आंबेगाव तालुक्यांतील नागरिकांमधून विचारला जात आहे.
येथील नागरिकांना सध्या अक्षरशः जीव मुठीत धरून जगावे लागत आहे. शेतीत काम करणे, बाहेर फिरणे किंवा मुलांना शाळेत पाठवणेही धोक्याचे झाले आहे. या जीवघेण्या परिस्थितीमुळे नागरिक प्रचंड भयभीत झाले आहेत. त्यामुळे, या नरभक्षक किंवा हिंस्त्र झालेल्या बिबट्याचा त्वरित शोध घेऊन त्याला पकडावे किंवा त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वनविभागाकडे केली जात आहे. बिबट्यांच्या सततच्या हल्ल्यांमुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जुन्नर तालुका आणि परिसरात मानव-बिबट संघर्षाला तब्बल पंचवीस वर्षे उलटली असली तरी या समस्येचा शेवट अद्याप दिसत नाही. २००१ पासून १० ऑक्टोबर २०२५ पर्यंत जुन्नर वनविभागाच्या हद्दीत म्हणजे जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यांमध्ये बिबट हल्ल्यांमध्ये ५४ जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे १५४ नागरिक जखमी झाले आहेत. त्यापैकी अनेकांना आयुष्यभरासाठी अपंगत्व आले आहे. सुमारे २६ हजार ७६० पशुधनांचा बळी बिबट्यांनी घेतला आहे.
जुन्नर, शिरूर तालुका ठरतोय संघर्षाचा केंद्रबिंदू
वनविभागाच्या जुन्नर, ओतूर, मंचर, घोडेगाव, खेड, चाकण आणि शिरूर या परिक्षेत्रांपैकी जुन्नर तालुका हा संघर्षाचा केंद्रबिंदू ठरला आहे. माळशेज घाट, नाणेघाट आणि आसपासच्या डोंगराळ भागात वास्तव्य करणारे बिबटे हळूहळू ऊस पट्ट्यात स्थायिक झाले. ऊस शेतीत आसरा व पशुधनाच्या रूपाने सहज उपलब्ध अन्न मिळाल्याने बिबट्यांना अनुकूल वातावरण मिळाले. परिणामी, त्यांचा प्रजनन दर वाढला आणि मृत्युदर घटला.
बिबट्यांचा मानवी वस्तीत मुक्काम वाढला
एका मादी बिबट्याचा प्रजनन कालावधी दीड वर्षाचा असून, ती एकावेळी चार पिल्लांना जन्म देते. पूर्वी शेतात तसेच जंगलात लपून-छपून राहणारे बिबटे सध्या मानवी वस्तीत वावरताना दिसत आहेत. शेतकऱ्यांनी जनावरांचे गोठे बंदिस्त होत असल्याने बिबटे अन्न-पाण्याच्या शोधात थेट मानव वस्तीत घुसू लागले आहेत.
वाढते ऊस क्षेत्र ठरतेय मूळ समस्या
जुन्नर, ओतूर, मंचर, घोडेगाव, खेड, चाकण, शिरूर तालुक्यांत बिबट्याचा वावर वाढत आहे. जुन्नर तालुक्यात बिबट मानव संघर्षाने तीव्र रूप धारण केल्याचे दिसून येत आहे. जुन्नरच्या नाणेघाट, माळशेज, चिल्हेवाडी, पाचघर भागात वास्तव्य जास्त आहे. तर जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तालुक्यात ऊस क्षेत्रात लपण असल्याने वास्तव्य वाढले आहे. बिबट्याचा प्रजननाचा दर झपाट्याने वाढला असून मृत्यू दर कमी झाल्याने बिबट्यांची संख्या वाढली आहे.