Video: आंबेगावात बिबट्याची दहशत; ३ बिबट्यांचा मुक्तसंचार, एक बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 11:12 IST2025-12-03T11:11:04+5:302025-12-03T11:12:39+5:30
आंबेगावातील अवसरी कामठेमळा रोडवर तीन बिबटे रस्ता ओलांडून जात असतानाचा व्हिडिओ एका तरुणाने मोबाईल मध्ये कैद केला आहे

Video: आंबेगावात बिबट्याची दहशत; ३ बिबट्यांचा मुक्तसंचार, एक बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद
अवसरी : अवसरी खुर्द ता. आंबेगाव गावात बिबट्याची दहशत काही कमी होत नसल्याचे दिसत आहे. मंगळवारी रात्री आठ वाजता अवसरी कामठेमळा रोडवर गणपती कारखान्याजवळ तीन बिबटे रस्ता ओलांडून जात असतानाचा व्हिडिओ एका तरुणाने मोबाईल मध्ये कैद केला आहे. तर बुधवारी पहाटे हासवडमळा येथे लावलेल्या पिंजऱ्यात एक नर बिबट्या जेरबंद झाला आहे. वन विभागाने गणपती कारखाना परिसरात पिंजरे लावावे अशी मागणी सरपंच वैभव वायाळ यांनी केले आहे.
आंबेगावात बिबट्याची दहशत, ३ बिबटे रस्ता ओलांडताना व्हिडिओ समोर #Pune#ambegaon#leopard#FORESTpic.twitter.com/P6SpKripi0
— Lokmat (@lokmat) December 3, 2025
अवसरी खुर्द खालची वेश ते पंधराबिगा कामठेमळा परिसरात गेली चार ते पाच महिन्यापासून बिबट्याचा वावर असल्याने दोन महिन्यापूर्वी वन विभागाने गणपती कारखाना समोरील शेतात पिंजरा लावला होता. मात्र पंधरा दिवस पिंजरा लावून देखील बिबट्या पिंजऱ्याजवळ आलाच नाही. पंधराबिघा, कामठेमळा येथील शालेय विद्यार्थी ग्रामस्थांना ये-जा करण्याचा मुख्य रस्ता असल्याने रात्रीच्या वेळी सात नंतर या रस्त्याने वाहतूक सुरू असतानाच मंगळवारी रात्री आठ वाजताच्या सुमारे गणपती कारखानाच्या जवळ रस्ता ओलांडताना तीन बिबटे एका चार चाकी चालकाने मोबाईल मध्ये कैद केले आहे. तर हासवडमळा परिसरात उसाचे क्षेत्र मोठे असल्याने या ठिकाणी स्थानिक शेतकऱ्यांना वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने राजू गावडे, शरद गावडे, संदीप गावडे यांनी हासवडमळा येथे पिंजरा लावण्याची मागणी वनविभागाकडे केल्यानंतर वनविभागाने रविवारी रात्री पिंजरा लावला असता बुधवारी पहाटे एक नर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. पिंजरा लावण्याकरिता शेतकरी गुलाब इनामदार, नवाब इनामदार, बाळासाहेब गावडे, अनिल गावडे, रज्जाक पठाण यांनी बिबट्याला पकडण्यासाठी सहकार्य केले. बुधवारी मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले, वनरक्षक सी. एस. शिवशरण, बिबट शिग्र कृतिदल गावडेवाडी हे बिबट्याला अवसरी उद्यानात घेऊन गेले आहेत. अवसरी खुर्द गावात बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने पिंजरे लावण्याची मागणी जोर धरू लागली असून अवसरी खुर्द गणपती कारखान्याजवळ दुपारपर्यंत पिंजरा लावण्यात येईल अशी माहिती मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी दिली.