बिबट्या लोकांना मारतो अन् तुम्ही त्याला वाचवता; ज्या घरातील व्यक्तीचा जीव गेला तिथे जाऊन पहा
By श्रीकिशन काळे | Updated: October 22, 2023 14:02 IST2023-10-22T14:00:28+5:302023-10-22T14:02:22+5:30
सध्या बिबट्यांनी धुमाकूळ घातलाय, बिबट्यांच्या हल्ल्यामुळे लोकांचा जीव जातोय

बिबट्या लोकांना मारतो अन् तुम्ही त्याला वाचवता; ज्या घरातील व्यक्तीचा जीव गेला तिथे जाऊन पहा
पुणे : ‘‘सध्या बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बिबटे लोकांवर हल्ले करत आहेत. जुन्नरच्या परिसरात किती लोकं त्यामुळे जीव गमावत आहेत. ज्या घरातील माणसाचा जीव गेला असेल, त्यांच्या घरी जाऊन पहा. तिथे राहा. तिथल्या महिलेसोबत सरपण आणायला जाऊन बघा. मग कळेल बिबट्यामुळे काय होते ते. पण आपल्याकडे त्यावर काहीही केले जात नाही. परदेशात शिकारीला बंदी नाही, पण आपल्याकडे मात्र बंदी आहे. हा वेडेपणाच आहे,’’ असे मत ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी व्यक्त केले.
पुणे नगर वाचन मंदिरतर्फे शनिवारी सायंकाळी भांडाकार प्राच्यविद्या संशोधन संस्थेत गाडगीळ यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम झाला. त्यात ते बोलत होते. या वेळी पर्यावरण अभ्यासक गुरूदास नूलकर आणि डॉ. विजय एदलाबादकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. गाडगीळ यांचे आत्मचिरत्र ‘सह्याचला आणि मी एक प्रेमकहाणी’ या ग्रंथाला साहित्यसम्राट न. चिं. केळकर पुरस्कार मिळाला. त्याबद्दल या मुलाखतीचे आयोजन केले होते.
गाडगीळ म्हणाले,‘‘मी जगभर फिरलो आहे. परदेशात कुठेही वन्यप्राण्यांच्या शिकारीवर बंदी नाही. नॉर्वेमध्ये मूस म्हणजे सांबारासारखा प्राणी आहे. तिथे तो सर्वत्र दिसतो. त्याची शिकार करून मांस खाल्ले जाते. परंतु, आपल्याकडे मात्र शिकारीला बंदी आहे. खरंतर म्हणजे आज गडचिरोलीमध्ये हत्ती आलेत. त्यामुळे तिथे शेतीचे, लोकांचे नुकसान होत आहे. तसेच इथे जुन्नर परिसरातही बिबट्यांमुळे कितीतरी लोकांचे प्राण जात आहेत. पण त्यावर काहीही केले जात नाही. ठराविक प्रमाणाच्या वर संख्या वाढली तर शिकार करणे क्रमप्राप्त असते.’’
वन खाते नेहमी खोटे बोलते
‘‘विकासाच्या नावाखाली वृक्षतोड केली जाते. देशात सॅटेलाइटच्या इमेज दाखवून वन विभाग वनाच्छादन अधिक असल्याचे सांगते. परंतु, ते लोकं नेहमीच खोटी माहिती देतात. इस्त्रोचे संचालक सतीश धवन यांनी देखील सॅटेलाइटद्वारे वनाच्छादन कसे अधिक दाखवले जाते, ते उघड केले होते. तेव्हा देशात २३ टक्के वनाच्छादन सॅटेलाइटवर दाखवले. पण प्रत्यक्षात मात्र १७ टक्के होते. त्यावर वनअधिकारी मात्र चर्चा करून आम्हाला भाजीपाल्यासारखा भाव ठरवून २३ पण नको आणि १७ पण नको आपण १९ टक्के वनाच्छादन असल्याचे सांगू, असे बोलले. आता ही असले वनाधिकारी काय कामाचे !’ असा अनुभवही गाडगीळ यांनी सांगितला.
गावपातळीवर ठरवा
ज्या ठिकाणी जैवविविधता आहे, त्याचा अधिकारी स्थानिक नागरिकांचाच हवा. त्यासाठी जैवविविधता नोंद वहीची संकल्पना मी मांडली. पण त्याकडेही सरकारकडून दुर्लक्ष झाले. स्थानिक पातळीवर जर वन्यजीव पीकांचे नुकसान करत असतील, तर त्याचे काय करायचे, याचा अधिकारी स्थानिक ग्रामस्थांना हवा, ठराविक प्रमाणात शिकार करायला परवानगी असायला हवी, असे गाडगीळ म्हणाले.