शिरूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ; आता ४ शेळ्यांचा फडशा पाडला, गावात भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 20:57 IST2025-11-05T20:56:59+5:302025-11-05T20:57:13+5:30
बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे शेतकऱ्यांपासून ते नागरिक आणि लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

शिरूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ; आता ४ शेळ्यांचा फडशा पाडला, गावात भीतीचे वातावरण
रांजणगाव गणपती : निमगाव म्हाळुंगी (ता.शिरुर) येथे एका शेतकऱ्याच्या चार शेळ्यांचा बिबट्याने फडशा पाडल्याची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने सरपंच डॉ.सचिन चव्हाण आणि ग्रामपंचायत अधिकारी गुलाबराव नवले यांनी बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी एका लेखी पत्राद्वारे केली आहे.
निमगाव म्हाळुंगी ते कोंढापुरी रस्त्याच्या बाजूला राहणारे नामदेव जयवंत चौधरी रात्रीच्या सुमारास घरात झोपलेले असताना, पहाटेच्या सुमारास कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आल्याने ते बाहेर आले. तेव्हा गोठ्यातून बिबट्या निघत असल्याचे दिसले. त्यांनी गोठ्यात पाहिले असता, बिबट्याच्या हल्ल्यात चार शेळ्या ठार झाल्या होत्या. या घटनेमुळे शेतकऱ्याला मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटना समजल्यावर वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर, वनपरिमंडळ अधिकारी गौरी हिंगणे आणि नियतक्षेत्र वनअधिकारी प्रमोद पाटील घटनास्थळी पोहोचले. तेथे सरपंच डॉ.सचिन चव्हाण, नामदेव चौधरी, शरद पलांडे, रोहन चौधरी, एकनाथ लांडगे आणि छाया चौधरी यांच्या उपस्थितीत चारही मृत शेळ्यांचा पंचनामा करण्यात आला.
दरम्यान, रात्री विश्वनाथ टाकळकर यांच्या गायींच्या गोठ्यात बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुत्र्यांच्या जोरदार भुंकण्यामुळे बिबट्या तिथून पळून गेला, असे कांतिलाल टाकळकर यांनी सांगितले. दिवसेंदिवस निमगाव म्हाळुंगी परिसरात बिबट्याचा वावर वाढत असून, गेल्या महिनाभरापासून बिबटे वाड्या-वस्त्यांवर जाऊन पाळीव प्राण्यांवर, तसेच शेळ्या, मेंढ्या व इतर जनावरांवर हल्ले करत आहेत.
बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे शेतकऱ्यांपासून ते नागरिक आणि लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी बिबट्यांचा योग्य प्रकारे बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. वनपरिमंडळ अधिकारी गौरी हिंगणे आणि नियतक्षेत्र वनअधिकारी प्रमोद पाटील यांनी घटनास्थळी भेट देताना सांगितले की, पिंजरा उपलब्ध होताच, या परिसरात पिंजरा लावण्यात येईल.