शेतकऱ्यावरील बिबट हल्ला बनावट, वन विभागाच्या तपासात असा झाला,'खुलासा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 19:47 IST2025-03-05T19:44:17+5:302025-03-05T19:47:44+5:30
वन्यप्राणी बिबट हा त्याचे नैसर्गिक सवयीने भक्ष्यावर पुढील पायाने हल्ला करतो, त्यावेळी त्याच्या पुढील पायाची सर्व नखे बाहेर येतात.

शेतकऱ्यावरील बिबट हल्ला बनावट, वन विभागाच्या तपासात असा झाला,'खुलासा'
नारायणगाव : हिवरे तर्फे नारायणगाव (भोरमळा) येथील शेतकरी किसन लक्ष्मण भोर यांचेवर दिनांक २८.०२.२०२५ रोजी झालेला बिबट हल्ला वास्तविकरित्या झाला नसल्याचे ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे , अशी माहिती जुन्नर वन विभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली .
किसन लक्ष्मण भोर यांचे मालकीचे शेतातील शाळु (ज्वारी) विळ्याने कापत असताना दिनांक २८.०२.२०२५ रोजी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान वन्यप्राणी बिबटने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना नारायणगाव येथील विघ्नहर्ता हॉस्पीटल येथे पुढील उपचाराकरीता दाखल करण्यात आले होते , या घटनेची माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी, ओतूर यांनी आपले अधिनस्त कर्मचाऱ्यांसमवेत तात्काळ घटनास्थळी तसेच विघ्नहर्ता हॉस्पीटल येथे जाऊन आवश्यक ती मदत केली होती .
किसन भोर यांना वन्यप्राणी बिबट हल्ल्याच्या अनुषंगाने आवश्यक नुकसान भरपाई देणेसाठी आवश्यक स्थळपाहणी दि. ०१.०३.२०२५ रोजी केली असता घटनास्थळाच्या चारही बाजूंनी ऊस शेती असून सदर परिसरात पायी फिरुन पाहणी केली . ज्या ठिकाणी बिबट हल्ला झाला तेथे वन्यप्राणी बिबट्याच्या पाऊलखुणा, विष्ठा इ. अप्रत्यक्षखुणा / पुरावे आढळून आले नाहीत. वन्यप्राणी बिबट हा त्याचे नैसर्गिक सवयीने भक्ष्यावर पुढील पायाने हल्ला करतो, त्यावेळी त्याच्या पुढील पायाची सर्व नखे बाहेर येतात. किसन भोर यांना झालेली जखम ही त्यांच्या डाव्या पायाच्या पिंढरीवर (गुडघ्याच्या खालील भागावर) एकच उभा खोल ओरखडा असून तो वन्यप्राणी बिबटने केला नसल्याचे दिसून आले आहे, कारण वन्यप्राणी बिबटचा हल्ला झालेल्या ठिकाणी त्याच्या नख्यांचे दोन-तीन ओरखडे उमटतात तसेच किसन भोर यांच्या शरीरावर इतरत्र कुठेही बिबट वन्यप्राण्याने चावा घेतल्याच्या खुणा देखील दिसून आल्या नाहीत. या सर्व बाबी विचारात घेतले असता त्यांचेवर वन्यप्राणी बिबट्याने हल्ला केला नसल्याचे तपासाअंती स्पष्ट झाले आहे , अशी माहिती सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांनी दिली .
बनावट हल्ल्याचे केले होते आंदोलन
बिबट्याच्या हल्ल्यामध्ये किसन भोर हे गंभीर जखमी झाल्याचा बनाव करुन नारायणगाव येथील पुणे-नाशिक महामार्गावर काही स्थानिक आंदोलकांनी अर्धवट माहितीच्या आधारे सुमारे दोन तास रास्तारोको आंदोलन करुन सामान्य नागरिकांना नाहक वेठीस धरले होते . आंदोलनामुळे स्थानिकांमध्ये अनावश्यक वन्यप्राणी बिबट बाबत भीती निर्माण करण्यात आली. आंदोलनामध्ये वनविभागाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. उत्तर पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी अफवावर विश्वास न ठेवता बिबट समस्या हाताळणीत वन विभागास सहकार्य करावे, असे आवाहन जुन्नर वन विभागाकडून करण्यात आले आहे.
"जुन्नर वनविभागामध्ये मानव-बिबट संघर्ष कमी करण्यासाठी वेळोवळी नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेवून मानवावरील हल्ले कमी करण्यासाठी अविरत प्रयत्न चालू आहेत. यामध्ये शीघ्र बचाव पथकाचे पाच ठिकाणी बिबट बेसकॅम्प, शेतातील घरांना सुमारे ६५० सौरकुंपणे, मेंढपाळ बांधवांसाठी ४१० तंबु व सौरदिवे पुरवठा करण्यात आले आहेत तसेच वन्यप्राणी बिबट्यास लोकवस्तीपासून परावृत्त करण्यासाठी सौरऊर्जा चलित अॅनायडर्स ७५ ठिकाणी, तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रणाली ५ ठिकाणी प्रायोगिक तत्वावर बसविण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत ३८८ आपदा मित्रांना मानव-बिबट संघर्षाच्या अनुषंगाने प्रशिक्षण, दृक-श्राव्य माध्यमातून व्यापक प्रमाणात जनजागृती असे अनेक प्रकल्प राज्यात पथदर्शी ठरत आहेत. याबाबत लगतच्या अहिल्यानगरमध्ये वाढत्या मानव-बिबट संघर्षाच्या अनुषंगाने तेथील सन्माननीय लोकप्रतिनिधींना येथील प्रयत्नांचे कौतुक वाटल्याने याबाबत माहिती घेत आहेत." - वनपरिक्षेत्र अधिकारी , ओतूर