Leopard Attack In Otur : ओतूर येथे धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 13:59 IST2025-10-03T13:59:14+5:302025-10-03T13:59:32+5:30
रात्रगस्त करणाऱ्या वनविभागाच्या पथकाने ही बाब लक्षात आणून घेतली. पकडलेला बिबट वनविभागाने ताब्यात घेऊन माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रात दाखल केला आहे.

Leopard Attack In Otur : ओतूर येथे धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
ओतूर : ओतूर शहरातील बारदारी रस्ता, चैतन्य विद्यालय, श्री संत गाडगेबाबा महाराज विद्यालय परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेची तात्काळ दखल घेत वनविभागाने परिसरात पिंजरे लावण्याची व्यवस्था केली होती.
बुधवार १ ऑक्टोबर रोजी रात्री अंदाजे साडेअकरा वाजता चैतन्य विद्यालयाजवळ लावलेल्या पिंजर्यात साधारण सात वर्षांचा नर जातीचा बिबट अडकला. रात्रगस्त करणाऱ्या वनविभागाच्या पथकाने ही बाब लक्षात आणून घेतली. पकडलेला बिबट वनविभागाने ताब्यात घेऊन माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रात दाखल केला आहे.
या कारवाईत ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सारिका बुट्टे, वनरक्षक विश्वनाथ बेले, किशन खरवडे, वनमजूर गणपत केदार, किशन केदार, फुलचंद खंडागळे, सागर विरनक, साहेबराव पारधी तसेच आळे येथील रेस्क्यू टीम व ग्रामस्थ यांनी सहकार्य केले.
दरम्यान, वनविभाग, ओतूर यांच्याकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, रात्री अपरात्री काम करताना स्वतःची सुरक्षितता जपावी, बाहेर पडताना हातात बॅटरी किंवा काठी बाळगावी,बिबट प्रवण क्षेत्रातून वाहन चालविताना सावकाश चालवावे किंवा गाडीचा हॉर्न मोठ्याने वाजवावा, जेणेकरून वन्यप्राणी आपला मार्ग बदलतील व अपघात टाळता येतील.