Leopard Attack : जुन्नर परिसरात वनविभाग सक्रिय; दोन बिबट माद्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 15:12 IST2025-12-25T15:10:39+5:302025-12-25T15:12:28+5:30
- एका आठवड्यात दोन बिबट माद्या जेरबंद झाल्याने अमिरघाट व परिसरातील नागरिकांनी काहीसा दिलासा व्यक्त केला आहे.

Leopard Attack : जुन्नर परिसरात वनविभाग सक्रिय; दोन बिबट माद्या ताब्यात
ओतूर : अमिरघाट, ता. जुन्नर परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हालचाली वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही दिवसांपूर्वी सोमनाथ ठिकेकर यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती.
या पार्श्वभूमीवर वनविभागाच्या वतीने अमिरघाट परिसरात पिंजरे लावण्यात आले होते. त्यानुसार मंगळवार, दि. २४ डिसेंबर रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास एका बिबट मादीला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. बिबट मादीचे वय अंदाजे ६ ते ७ वर्षे असल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सारिका बुट्टे, वनरक्षक विश्वनाथ बेले, किशन खरोडे यांच्यासह वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीची पाहणी करून आवश्यक त्या सर्व सुरक्षा उपाययोजना राबवत बिबट मादीला ताब्यात घेण्यात आले.
यानंतर जेरबंद करण्यात आलेल्या बिबट मादीला सुरक्षितपणे माणिकडोह बिबट निवारा केंद्रात दाखल करण्यात आले. या संपूर्ण कारवाईदरम्यान सोमनाथ ठिकेकर, सचिन दाते, निखिल इसकांडे, सागर दाते, अमोल ठिकेकर तसेच इतर ग्रामस्थांनी वनविभागाला मोलाचे सहकार्य केले.
विशेष म्हणजे, याच ठिकाणी यापूर्वी दि. २२ डिसेंबर रोजी सुमारे ६ ते ७ महिन्यांची एक बिबट मादी जेरबंद करण्यात आली होती. त्यामुळे अवघ्या एका आठवड्यात दोन बिबट माद्या जेरबंद झाल्याने अमिरघाट व परिसरातील नागरिकांनी काहीसा दिलासा व्यक्त केला आहे.
दरम्यान, वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की बिबट किंवा इतर वन्यप्राण्यांबाबत कोणतीही समस्या उद्भवल्यास घाबरून न जाता तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा. सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वतःहून कोणतीही कारवाई करू नये, तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही वनविभागाने केले आहे.