leopard attack : बिबट्यांच्या हालचाली ओळखा, सावध व्हा..! विद्यापीठ परिसरात प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 10:21 IST2025-11-26T10:19:11+5:302025-11-26T10:21:14+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात बिबट्या दिसल्याच्या अफवेमुळे विद्यापीठ प्रशासनाने तात्काळ विद्यार्थी, अध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांना सतर्कतेची सूचना दिली.

leopard attack : बिबट्यांच्या हालचाली ओळखा, सावध व्हा..! विद्यापीठ परिसरात प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात बिबट्या दिसल्याच्या अफवेमुळे विद्यापीठ प्रशासनाने तात्काळ विद्यार्थी, अध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांना सतर्कतेची सूचना दिली. तसेच विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालय येथील सभागृहात बिबट्या संदर्भातील जनजागृतीपर कार्यशाळा घेतली.
यात कोथरूड येथील वनरक्षक कृष्णा हाक्के, भांबुर्डा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज बरबोले व रेस्क्यू टीमचे किरण राहिलकर यांनी मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी बिबट्यांच्या हालचाली, त्यांच्या वर्तनातील वैशिष्ट्ये, आवश्यक खबरदारी, परिसरात फिरताना घ्यावयाची सुरक्षा उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
परिपत्रकाद्वारे विद्यापीठाच्या सर्व विभागप्रमुख, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना अनावश्यक फिरणे टाळण्याचे, नेहमी समूहाने हालचाल करण्याचे आणि बिबट्या दिसल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. आपत्कालीन परिस्थितीसाठी वनविभाग आणि सुरक्षा विभागाचे दूरध्वनी क्रमांकही उपलब्ध करून दिले. अफवा पसरवू नयेत, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. पाषाण पंचवटी, विद्यापीठ, वेताळ टेकडी परिसरातील नागरिकांनी पुढील काही दिवस भल्यापहाटे बाहेर टेकडीवर फिरणे टाळणे गरजेचे आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.