मंचर शहरात बिबट्याचा वावर वाढला;नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 16:39 IST2025-03-02T16:38:28+5:302025-03-02T16:39:58+5:30
अनेक नागरिकांना बिबट्याने दर्शन दिले आहे. वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मंचर शहरात बिबट्याचा वावर वाढला;नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
मंचर : शहर व परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य संदीप ऊर्फ लक्ष्मण थोरात भक्ते यांनी केली असून, तसे निवेदन वनविभागाला दिले आहे.
मंचर शहर परिसरात पिंपळगाव फाटा, भक्तेमळा, एस कॉर्नर डोबीमळा या ठिकाणी बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून, अनेक नागरिकांना बिबट्याने दर्शन दिले आहे. वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी भक्तेमळा येथील संदीप ऊर्फ (लक्ष्मण) थोरात भक्ते यांनी केली आहे. याबाबत मंचर ग्रामस्थांच्या वतीने वनविभागाला निवेदन देण्यात आले आहे. मंचर परिसरातील एस कॉर्नर, भक्तेमळा, पिंपळगाव फाटा या परिसरात बिबट्याचे दर्शन झाले असून, या ठिकाणावरून अण्णासाहेब आवटे महाविद्यालय, महात्मा गांधी विद्यालय या ठिकाणी अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी जात असतात, तसेच लहान मुले देखील मराठी शाळेत जात असतात.
तसेच शेतकरीवर्ग आपल्या शेतात रात्रीच्या वेळी पाणी भरण्याचे काम करत असतात. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याचा वावर वाढल्याने अनेकांच्या जीवितास धोका होऊ शकतो. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याअगोदर वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली असून, याबाबतचे निवेदन वनविभागाचे संभाजी गायकवाड यांना देण्यात आले आहे. वनविभागाच्या वतीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद केले जाईल, असे आश्वासन देण्यात आले. यावेळी स्वप्नील बेंडे, विक्रांत भोर, राजेंद्र थोरात, श्रेयश थोरात आदी उपस्थित होते.