जात-धर्माच्या झेंड्याखाली नंगानाच; सभागृहात कायदा मोडला जातोय - बच्चू कडू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 18:47 IST2025-07-21T18:45:07+5:302025-07-21T18:47:17+5:30
कायद्याचा धाक दाखवला जातो आणि दडपशाही केली जाते, सभागृहातच कायदा मोडला जात असेल, तर सामान्य जनतेने काय करायचं?

जात-धर्माच्या झेंड्याखाली नंगानाच; सभागृहात कायदा मोडला जातोय - बच्चू कडू
नीरा : प्रत्येकजण आपल्या जातीचा किंवा धर्माचा झेंडा घेऊन बसला आहे. त्यांनी नंगानाच केला, तरी त्यांना चालते. कारण त्यांच्या हाती जातीचे धर्माचे ''झेंडे'' आहेत. पण सामान्य जनतेने प्रश्न विचारले, तर त्यांच्यावर खटले दाखल होतात. कायद्याचा धाक दाखवला जातो आणि दडपशाही केली जाते, सभागृहातच कायदा मोडला जात असेल, तर सामान्य जनतेने काय करायचं?" असा संतप्त सवाल माजी मंत्री बच्चू कडू यांनी केला आहे.
नुकताच दिव्यांगांसाठी लढा उभारलेल्या बच्चू कडू यांचा रविवारी (दि.२०) रात्री नीरा येथे दिव्यांग बांधवांनी नागरी सत्कार केला. त्यांच्या नेतृत्त्वाखाली दिव्यांगांच्या मानधन वाढीसाठी नीरा येथे मोठं आंदोलन करण्यात आलं होतं. त्या आंदोलनाला यश मिळून पेन्शन २,५०० रुपये करण्यात आली आहे. यानिमित्ताने दिव्यांग बांधवांनी हलगी वाजवून आनंदोत्सव साजरा केला. उपस्थितांना जिलेबी वाटप केले आणि कडू यांना विशेष सन्मान दिला. यावेळी पृथ्वीराज काकडे, प्रहारचे राज्य समन्वयक गौरव जाधव, महिला अध्यक्ष सुरेखा ढवळे, राज्य अध्यक्ष धर्मेंद्र सातव, बारामती तालुका अध्यक्ष मृत्युंजय सावंत, दौंड तालुका अध्यक्ष लवांडे, दादा ढमे, जगन्नाथ धायगुडे, अभिजित वाडेकर, संजय भंडलकर, दिव्यांग महिला बांधव व प्रहारचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कडू पुढे म्हणाले “शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणवणाऱ्या राज्यात दिव्यांगांसाठी अजूनही आंदोलन करावं लागतं, ही दुर्दैवाची बाब आहे. संवेदनाहीन लोक सत्तेवर येतात, तेव्हा संवाद हरवतो आणि यंत्रणा कुचकामी होते. हे वास्तव बदलणं गरजेचं आहे. कार्यक्रमात अनेक दिव्यांग कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि युवा उपस्थित होते. जातीधर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा विचार करणाऱ्या नेतृत्वाची गरज असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
कायदा एकतर्फी कसा?
राज्याचे कृषिमंत्री सचिन तेंडुलकर यांनी केलेल्या ऑनलाईन गेम अॅपच्या जाहिरातीवरूनही बच्चू कडू यांनी टीकेची झोड उठवली. “सचिन तेंडुलकर यांनी ‘रमी’ची जाहिरात केली आणि त्याचे बळी राज्याचे कृषिमंत्री ठरले. मोबाईलवर पत्ते खेळले तर चालते, पण ऑफलाईन खेळले तर पोलीस पकडतात. कायदा असाच एकतर्फी असेल का?” असा खोचक सवाल त्यांनी केला.
नक्षलवाद केवळ दोन तालुक्यात मग जन सुरक्षा कायदा कशासाठी ?
जनसुरक्षा कायद्यावरही त्यांनी सरकारला धारेवर धरले. “सरकार म्हणतं महाराष्ट्रात फक्त दोनच तालुक्यात नक्षलवाद आहे, मग पूर्ण राज्यात हा कायदा लागू करण्याची गरज काय? खरे नक्षलवादी कोण आहेत हे जर जाहीर केलं, तर देशात मोठा स्फोट होईल,” असा इशारा देत त्यांनी शासनाच्या हेतूंवर कडू यांनी संशय व्यक्त केला.
पुणे जिल्हाध्यक्ष पदी मंगेश ढमाळ
प्रहार जनशक्ती पक्षाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी नीरा येथील दिव्यांग मदत केंद्राचे चालक मंगेश ढमाळ यांची माजी मंत्री बच्चू कडू यांनी नियुक्ती केली. कडू यांनी मंगेश ढमाळ यांना नियुक्तीचे पत्र दिले. या पदाच्या माध्यमातून शेतकरी, नोकरदार, शैक्षणिक, आरोग्य, रोजगाराचा तसेच दिव्यांच्या प्रश्नांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन माजी मंत्री बच्चू कडू यांनी केले.