भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचे आजपासून कामबंद आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 09:20 IST2025-05-15T09:18:22+5:302025-05-15T09:20:26+5:30
संपाबाबत सरचिटणीस अजित लांडे, धनाजी बाबर, कार्याध्याक्ष सुधीर पाटील यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले आहे

भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचे आजपासून कामबंद आंदोलन
पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला तांत्रिक वेतनश्रेणीचा प्रश्न सोडविण्यात राज्य सरकारकडून होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या पुणे विभागातील कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून (दि. १५) बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष विजय मिसाळ यांनी दिली. दरम्यान, भूमि अभिलेख राजपत्रित संघटनेच्या वतीने या संपाला जाहीर पाठिंबा दिल्याची माहिती संघटनेचे अनिल माने, शिवाजी भोसले यांनी दिली.
संपाबाबत सरचिटणीस अजित लांडे, धनाजी बाबर, कार्याध्याक्ष सुधीर पाटील यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. या संपाला पाठिंबा देण्याकरिता विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेने पहिल्या टप्प्यात काळी फीत लावून शासकीय कामे करीत सरकारच्या वेळ काढून धोरणाचा निषेध करण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलनाची दखल न घेतल्यास ही संघटनासुद्धा बेमुदत संपात सहभागी होणार आहे. भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांना तांत्रिक वेतन श्रेणी देण्यासाठी तत्कालीन जमाबंदी आयुक्त एन. के. सुधांशू यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल वर्षभरापूर्वी सरकारकडे देण्यात आला आहे. अद्याप त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्यभरातील कर्मचाऱ्यांमध्ये वेतनश्रेणीच्या प्रश्नावर तीव्र असंतोष आहे. या कर्मचाऱ्यांच्या सेवा भरती नियमात सरकारने २०१२ मध्ये दुरुस्ती करून सर्व पदांसाठी तांत्रिक अर्हता निश्चित केली. मात्र, वेतन कारकून संवर्गातील दिल्या जात असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे.
स्वामित्व योजनेत राज्यातील सुमारे चाळीस हजार गावांचे ड्रोन सर्वेक्षण सुरू आहे. यासाठी सरकारने अतिरिक्त कर्मचारी भरती केले नसून, या आस्थापनेवरील सुमारे २ हजार कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. अशाही परिस्थितीत कर्मचारी वर्ग काम करत आहेत. तसेच राजपत्रित वर्ग दोन अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीची फाईल मंत्रालयात गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असल्यामुळे गट ब मधील राजपत्रित वर्ग दोन अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. संपूर्ण यंत्रणा अतिरिक्त प्रभाराने मेटाकुटीस आली आहे. त्यामुळे या खात्यामध्ये मोठा असंतोष आहे. त्यामुळेच कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.